LIVE UPDATES

आजगाव येथे दुचाकीस्वाराला वाचवताना कदंबा बस कलंडल्याने अपघात

सुदैवाने अनर्थ टळला : बसमधून 45 प्रवासी करीत होते प्रवास
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: July 27, 2026 20:59 PM
views 59  views

सावंतवाडी : गोवा राज्याची कदंबा प्रवासी बस आजगावजवळ दुचाकी वाहन चालकाला वाचवताना कलंडली. या अपघातात 45 प्रवासी बालबाल बचावले आहेत. चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठी हानी टळली आहे.

गोवा येथील पणजी येथून संध्याकाळी साडेचार वाजता सुटणारी पणजी शिरोडा मार्गे वेंगुर्ला ही वस्तीची गाडी शिरोडाच्या दिशेने येत असताना आजगाव वाघबीळाजवळ आली. यावेळी मळेवाडच्या दिशेने चार चाकी गाडी जात असताना त्या घातक वळणावर दुचाकी वाहन चालकाने ओव्हर टेक करण्याचा प्रयत्न केला. त्या दुचाकी स्वराला वाचवण्याच्या नादात ही बस खोलदरीच्या काही फूट अंतरावर कलंडली. या बसमध्ये एकूण 45 प्रवासी प्रवास करत होते. प्रवाशांना आपत्कालीन दरवाज्यातून बाहेर काढण्यात आले. या बसचे चालक धनंजय आसोलकर व वाहक सर्वेश नाईक यांनी प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले. यावेळी परिसरातील ग्रामस्थांनी धाव घेतली. मदतीसाठी धाव घेऊन प्रवाशांना वाचविण्यात आले. या प्रवाशांपैकी कोणालाही दुखापत झालेली नाही. परंतु, काही फूट अंतरावर जर ही बस कलंडली असती तर किमान 200 फूट खोल दरीत ही बस कोसळून मोठा अपघात झाला असता. परंतु,  बस चालकाच्या प्रसंगावधानामुळे बस अलीकडेच कलंडली. दुचाकीस्वाराच्या चुकीमुळे 45 प्रवाशांचे जीव धोक्यात जाणार होते. परंतु, चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना घटना टळली.