LIVE UPDATES

ज्येष्ठ पत्रकार उत्तम वाडकर यांचे निधन

दोन सख्ख्या भावांनी घेतला जगाचा निरोप
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: July 26, 2026 20:49 PM
views 28  views

सावंतवाडी : ज्येष्ठ पत्रकार, 'साप्ताहिक संघटने'चे राष्ट्रीय नेते उत्तम उर्फ भास्कर सूर्यकांत वाडकर (वय ७२, रा. खासकीलवाडा, सावंतवाडी) यांचे रविवारी सायंकाळी कोल्हापूर येथील उपचारादरम्यान निधन झाले. उत्तम वाडकर यांच्या निधनाच्या अवघ्या १२ तास आधीच त्यांचे लहान बंधू उदय सूर्यकांत वाडकर (वय ६१) यांचे शनिवारी निधन झाले होते. दोन दिवसात दोन सख्ख्या भावांची प्राणज्योत मालवल्याने सावंतवाडी शहरासह राजकीय, सामाजिक व पत्रकारिता क्षेत्रातून तीव्र दुःख व्यक्त केले जात आहे.

उदय वाडकर हे अनेक वर्षांपासून 'प्रोफेशनल कूरियर'च्या माध्यमातून सेवा बजावत होते. शनिवारी त्यांचे निधन झाल्यानंतर रविवारी सकाळीच त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते. या दुःखातून वाडकर कुटुंब सावरत नाही तोच, रविवारी सायंकाळी कोल्हापूर येथे उपचार घेणारे ज्येष्ठ बंधू उत्तम वाडकर यांचीही प्राणज्योत मालवल्याची बातमी धडकली. अवघ्या १२ तासांत दोन्ही छत्र हरपल्याने वाडकर कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, हे वृत्त समजताच अनेकांना मोठा धक्का बसला. उत्तम वाडकर यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात पत्रकारितेतून केली. सामाजिक भान जपून त्यांनी वृत्तपत्रांच्या माध्यमातून नेहमीच जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडली. त्यांनी स्वतःचे साप्ताहिक सुरू करून सरकारदरबारी सर्वसामान्यांचे प्रश्न मांडले. पत्रकारितेसोबतच साप्ताहिक संघटनेच्या माध्यमातून त्यांनी देशपातळीवर नेतृत्व केले. या संघटनेचे अध्यक्ष म्हणून काम करताना त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात राज्य व राष्ट्रीय पातळीवरील अधिवेशने आणि बैठका यशस्वीरीत्या पार पाडल्या.

सिंधुदुर्ग प्रेस क्लबचे अध्यक्षपद भूषवताना त्यांनी पत्रकारांच्या हक्कासाठी मोलाचा लढा दिला. त्यांच्या या योगदानाबद्दल त्यांना 'प्रेस क्लब भूषण' पुरस्काराने गौरविण्यात आले होते. याशिवाय सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली होती. पत्रकारितेत सक्रिय असतानाच त्यांनी राजकीय क्षेत्रातही आपला ठसा उमटवला. शिवसेनेचे सावंतवाडी आणि दोडामार्ग तालुक्याचे तालुकाप्रमुख म्हणून त्यांनी यशस्वी जबाबदारी पार पाडली. त्या काळात दक्षिण कोकणात शिवसेना तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवून संघटन बळकट करण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याशी त्यांचा थेट स्नेह होता आणि बाळासाहेब त्यांना वैयक्तिकरीत्या ओळखत असत. शिवसैनिक म्हणून काम करताना त्यांना सदैव सार्थ अभिमान वाटत असे. काही काळानंतर त्यांनी राजकारणापासून फारकत घेत पुन्हा पूर्णवेळ स्वतःला पत्रकारितेत आणि सामाजिक कार्यात झोकून दिले होते.

मागील काही महिन्यांपासून त्यांची प्रकृती अस्वास्थ्यामुळे साथ देत नव्हती. कोल्हापूर येथे उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा कुलदीप वाडकर, विवाहित मुलगी, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे. उत्तम वाडकर यांचे पार्थिव रविवारी उशिरा कोल्हापूरहून सावंतवाडी येथील खासकीलवाडा निवासस्थानी आणण्यात येणार आहे. त्यानंतर उद्या, सोमवार दि. २७ जुलै रोजी सकाळी ९ वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या निधनाने सिंधुदुर्गातील एक अभ्यासू, आक्रमक आणि तत्त्वनिष्ठ ज्येष्ठ नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले आहे.