
नवी मुंबई : राज्यभरात मुसळधार कोसणाऱ्या पाऊसाने काही दिवस विश्रांती घेतली होती. यानंतर पुन्हा काही भागात पावसाला सुरुवात झाली आहे. . राज्यातील काही भागात पाऊसाने धुवाधार बॅटिंग केल्याने नद्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. नाशिक, कोकणासह घाटमाथ्यावर जोरदार पाऊस होत आहे. तर विदर्भासह मराठवाड्यात आज पाऊस होण्याची शक्यता आहे.
मुंबईसह उपनगरांमध्ये मुसळधार पाऊस सुरु असून मुंबई, गडचिरोली, ठाणे, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, चंद्रपूर येथे जोरदार वाऱ्यासह पावसाचा अंदाज आहे. मराठवाड्यात आज पाऊस हजेरी लावणार आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, येत्या 12 तासांत 18 राज्यांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस बरसण्याचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, उत्तर भारतापासून ते पूर्व व मध्य भारतापर्यंतच्या राज्यांमध्ये हवामान तिव्र राहण्याची शक्यता असून काही भागात गारपीट होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र, गुजरात, बिहार, उत्तर प्रदेश, दिल्ली, पंजाब, राजस्थान, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, हरियाणा, जम्मू काश्मीर, पश्चिम बंगाल, झारखंड, ओडिशा, अरुणाचल प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड या राज्यांमध्ये 27 जुलैरोजी वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस बरसण्याचा इशारा हवामान विभागामार्फत देण्यात आला आहे.














