
वैभववाडी : हेत शेरेवाडी येथील गोविंद शंकर फोंडके यांच्या घरातील कपाटातून ५ लाख ३३ हजार ३५० किमतीचे सुमारे आठ तोळे सोन्याचे दागिने चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे कपाटातील इतर मौल्यवान दागिन्यांना हात न लावता केवळ त्यांच्या दिवंगत पत्नीचे दागिनेच लंपास करण्यात आल्याने या चोरीभोवती गूढ निर्माण झाले असून पोलिसही चक्रावले आहेत.
गोविंद फोंडके यांच्या तक्रारीनुसार, हेत शेरेवाडी येथे त्यांचे राहते घर आहे. सुमारे वर्षभरापूर्वी त्यांच्या पत्नीचे निधन झाले होते. त्यानंतर पत्नीचे दागिने स्वच्छ करून त्यांनी कपाटातील एका स्वतंत्र पिशवीत सुरक्षित ठेवले होते. मे २०२६ मध्ये पायाला दुखापत झाल्याने उपचारासाठी त्यांना मुंबईला जावे लागले होते. काही दिवसांपूर्वी ते गावी परतल्यानंतर १५ जुलै रोजी त्यांनी कपाटातील दागिन्यांची पडताळणी केली असता पत्नीच्या दागिन्यांची पिशवी गायब असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
चोरीस गेलेल्या दागिन्यांमध्ये सोन्याचे मंगळसूत्र, हार आणि मोहनमाळ अशा एकूण सुमारे आठ तोळे वजनाच्या दागिन्यांचा समावेश असून त्यांची किंमत ५ लाख ३३ हजार ३५० इतकी आहे. याप्रकरणी त्यांनी वैभववाडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे.
- केवळ पत्नीचेच दागिने गायब; पोलिसांसमोर गूढ..
फोंडके यांच्या कपाटात दोन स्वतंत्र पिशव्यांमध्ये सोन्याचे दागिने ठेवले होते. त्यापैकी एका पिशवीत दिवंगत पत्नीचे दागिने, तर दुसऱ्या पिशवीत इतर कुटुंबीयांचे सुमारे १० लाख किमतीचे दागिने होते. मात्र चोरट्याने केवळ पत्नीच्या पिशवीतील दागिनेच चोरी केल्याने या प्रकारामागील नेमके कारण काय, असा प्रश्न पोलिसांनाही पडला आहे.













