
वेंगुर्ले : तालुक्यातील वेतोरे पालकरवाडी येथे एका शिक्षकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. शिक्षकाचे नाव पांडुरंग बिराप्पा वगरे (वय ५०) असे असून ते मूळचे सोलापूर- मंगळवेढा येथील रहिवासी होते. ते गेल्या १५ वर्षांपासून वेतोरे हायस्कूलमध्ये शिक्षक म्हणून कार्यरत होते.
सोमवारी २७ जुलै रोजी वेतोरा पालकरवाडी येथील गोगटे मंगल कार्यालयाच्या मागे ही घटना घडली. याबाबत शुभम संजय गोगटे यांनी वेंगुर्ला पोलिसात खबर दिली. पांडुरंग वगरे हे शिक्षक आपल्या पत्नी व एका मुली सहित गोगटे मंगल कार्यालयाच्या मागील चाळीत भाड्याने राहत होते. त्यांनी आपल्या राहत्या घरी लोखंडी अँगलला साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. सोलापूर - मंगळवेढा येथील हे शिक्षक आपल्या कुटुंबासमवेत गेली १५ वर्षे वेतोरा येथे राहत होते. वेतोरा हायस्कूल मध्ये ते आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी विषय शिकवत असत. आपल्या प्रेमळ स्वभावामुळे, विद्यार्थ्यांशी असलेल्या जिव्हाळ्याच्या नात्यामुळे आणि हसतमुख व्यक्तिमत्त्वामुळे ते विद्यार्थी, सहकारी शिक्षक आणि पालकांमध्ये अत्यंत लोकप्रिय होते. त्यांच्या जाण्याने वेतोरे गावात हळहळ व्यक्त होत आहे.
याबाबत पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनानंतर नातेवाईकांच्या ताब्यात दिला. मात्र आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. या प्रकरणाचा अधिक तपास हेड कॉन्स्टेबल योगेश सराफदार करत आहेत.














