
नवी दिल्ली : लॉस एंजेलिस ऑलिम्पिक २०२८ साठी क्रिकेट पात्रता सामने फेब्रुवारी-मार्च २०२८ मध्ये बांगलादेश आणि युनायटेड स्टेट्समध्ये आयोजित केले जातील. १२८ वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर क्रिकेटचे ऑलिम्पिक खेळांमध्ये पुनरागमन होत आहे. २०२८ च्या लॉस एंजेलिस ऑलिम्पिकसाठी पुरुषांचे पात्रता सामने ५ ते १३ फेब्रुवारी २०२८ दरम्यान बांगलादेशात, तर महिलांचे पात्रता सामने २६ फेब्रुवारी ते ५ मार्च २०२८ दरम्यान युनायटेड स्टेट्समध्ये खेळवले जातील. याबाबतची माहिती आयसीसीने रविवारी दिली.
बाली येथे झालेल्या बैठकांनंतर जारी केलेल्या निवेदनात आयसीसीने म्हटले आहे की, "हे सामने लॉस एंजेलिस २०२८ ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटच्या पुनरागमनासाठीच्या पात्रता प्रक्रियेचा अंतिम टप्पा असतील." प्रत्येक स्पर्धेत आठ संघ असतील. ज्यांना चार-चार संघांच्या दोन गटांत विभागले जाईल. एकूण १३ सामने खेळवले जातील. आपापल्या गटातील संघ एकमेकांशी एकदाच खेळतील आणि प्रत्येक गटातील अव्वल संघ अंतिम सामन्यात प्रवेश करेल. अंतिम सामन्यातील विजेता संघ लॉस एंजेलिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरणारा शेवटचा संघ असेल.
लॉस एंजेलिस ऑलिम्पिकमधील पुरुष आणि महिलांच्या टी 20 प्रकारात प्रत्येकी सहा संघ सहभागी होतील. यामध्ये आफ्रिका, आशिया, युरोप आणि ओशनिया या खंडांचे प्रतिनिधित्व सुनिश्चित असेल. यावर्षी झालेल्या टी 20 विश्वचषकात आशियाई संघांमध्ये सर्वोत्तम कामगिरी केल्यामुळे भारतीय महिला संघाने आधीच ऑलिम्पिकसाठी पात्रता मिळवली आहे.
पुरुषांचा संघही जागतिक क्रमवारीत (वर्ल्ड रँकिंग) असलेल्या स्थानानुसार थेट पात्र ठरू शकतो, ज्यासाठी ३१ डिसेंबर २०२६ ही अंतिम तारीख निश्चित करण्यात आली आहे. यासाठी, भारताला त्या तारखेपर्यंत आशियातील सर्वोच्च क्रमांकाचा संघ म्हणून कायम राहावे लागेल.
भारतीय पुरुष संघाने गेल्या दोन टी 20 विश्वचषकांचे विजेतेपद पटकावले आहे. रविवारी, आयसीसीने आपल्या प्रमुख स्पर्धांच्या पात्रता सामन्यांच्या तारखांचीही घोषणा केली. २०२८ च्या टी 20 विश्वचषकासाठी आठ संघ पात्र ठरतील. फेब्रुवारी आणि मार्च २०२७ मध्ये नियोजित असलेल्या २०२७ पुरुष एकदिवसीय विश्वचषक पात्रता स्पर्धेत १० संघ सहभागी होतील आणि यात एकूण २३ सामने खेळवले जातील. या स्पर्धेचे विभाजन प्रत्येकी पाच संघांच्या दोन गटांत केले जाईल. त्यानंतर उपांत्य फेरी आणि अंतिम सामना होईल.
अव्वल चार संघ दक्षिण आफ्रिकेत होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकासाठी पात्र ठरतील. या स्पर्धेतील विजेता संघ थेट गट टप्प्यात स्थान मिळवेल, तर उर्वरित तीन संघ गट टप्प्यातील अंतिम जागा निश्चित करण्यासाठी 'सुपर सीरिज'मध्ये भाग घेतील. २०२८ पुरुष टी-२० विश्वचषकासाठी १६ संघांची जागतिक पात्रता स्पर्धा २०२८ च्या पहिल्या तिमाहीत आयोजित केली जाईल, ज्यामध्ये एकूण ३१ सामने खेळवले जातील.
या स्पर्धेतील संघांना प्रत्येकी चार संघांच्या चार गटांत विभागले जाईल. गट टप्प्यानंतर, स्पर्धा उपांत्यपूर्व फेरी, उपांत्य फेरी आणि अंतिम सामन्याद्वारे पुढे जाईल.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all








