
सावंतवाडी : जिद्द, मेहनत आणि कलात्मक कौशल्याच्या जोरावर गावाच्या मातीतून थेट जागतिक चित्रपटसृष्टीपर्यंत झेप घेता येते, हे सावंतवाडी तालुक्यातील कारिवडे गावचा सुपुत्र भवनेश माळकर याने सिद्ध करून दाखवले आहे. सध्या देशभरात चर्चेचा विषय ठरत असलेल्या भव्यदिव्य ‘रामायण’ चित्रपटाच्या निर्मितीत भवनेशने ‘Prep Artist’ म्हणून महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.
विशेष म्हणजे, जागतिक स्तरावर नामांकित आणि आठ ऑस्कर पुरस्कारांनी गौरविण्यात आलेल्या DNEG या आंतरराष्ट्रीय व्हिज्युअल इफेक्ट्स कंपनीत काम करण्याची संधी त्याला मिळाली आहे. त्याच्या या यशामुळे सावंतवाडी तालुक्यासह कारिवडे गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
प्रत्यक्ष शूटिंग आणि व्हिज्युअल इफेक्ट्सच्या प्रक्रियेपूर्वी आवश्यक असलेल्या दृश्यांची डिजिटल पूर्वतयारी करण्याची जबाबदारी या कामात महत्त्वाची असते. जागतिक दर्जाच्या चित्रपट निर्मिती प्रक्रियेत सहभागी होत भवनेशने आपल्या कौशल्याची छाप उमटवली आहे.
विशेष म्हणजे, त्याची ही यशस्वी वाटचाल केवळ ‘रामायण’पुरती मर्यादित नाही तर केजीएफ फेम रॉकिंग स्टार यश यांच्या बहुप्रतीक्षित ‘टॉक्सिक’ या चित्रपटाच्या निर्मितीतही त्याने Prep Artist म्हणून आपले योगदान दिले आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या चित्रपट निर्मिती क्षेत्रात कारिवडेच्या या तरुणाने आपली वेगळी ओळख निर्माण करण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल टाकले आहे.
चित्रपटसृष्टीसारख्या अत्यंत स्पर्धात्मक क्षेत्रात स्वतःचे स्थान निर्माण करणे हे सोपे काम नाही. मात्र, सातत्यपूर्ण मेहनत, चिकाटी आणि कलात्मक कौशल्याच्या बळावर भवनेशने ही संधी यशस्वीपणे साधली. मोठ्या पडद्यावर चित्रपटाच्या क्रेडिट्समध्ये स्वतःचे नाव झळकणे, हे त्याच्या मेहनतीचे आणि जिद्दीचे फलित ठरले आहे.
भवनेशच्या या उल्लेखनीय यशामुळे कारिवडे गावासह संपूर्ण सावंतवाडी तालुक्याचा गौरव वाढला असून, त्याची वाटचाल चित्रपटसृष्टीत करिअर करू इच्छिणाऱ्या नवोदित तरुणांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरणार आहे.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all








