
रत्नागिरी : जिल्हा परिषद शाळांमधील शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासह दिव्यांग विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी राज्य शासनाने समग्र शिक्षा अभियानांतर्गत नवीन पदनिर्मितीला मंजुरी दिली आहे. या निर्णयानुसार रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या शाळांसाठी एकूण १२० शिक्षक आणि कर्मचाऱ्यांची पदे मंजूर करण्यात आली आहेत. यामध्ये ४५ विशेष शिक्षक, २५ कला शिक्षक, २५ क्रीडा शिक्षक आणि २५ संगणक सहाय्यकांचा समावेश आहे.
जिल्हा परिषद शाळांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून विशेष प्रशिक्षित शिक्षकांची कमतरता जाणवत होती. विशेषतः दिव्यांग विद्यार्थ्यांना त्यांच्या गरजेनुसार शिक्षण देणे, त्यांच्यासाठी विशेष अध्यापन पद्धती राबविणे आणि त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रशिक्षित शिक्षकांची आवश्यकता होती.
नव्या पदनिर्मितीमुळे ही गरज काही प्रमाणात पूर्ण होणार आहे. नवीन शैक्षणिक धोरणानुसार विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कला, क्रीडा आणि संगणक शिक्षणाला महत्त्व देण्यात आले आहे. मात्र, अनेक शाळांमध्ये या विषयांसाठी स्वतंत्र शिक्षक उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांना अपेक्षित शिक्षण मिळत नव्हते.
आता कला आणि क्रीडा शिक्षकांसह संगणक सहाय्यकांची नियुक्ती झाल्यानंतर या विषयांच्या अध्यापनाला गती मिळणार आहे. मंजूर पदांपैकी विशेष शिक्षक तालुकास्तरावर 'क्लस्टर' पद्धतीने विविध शाळांना भेटी देऊन दिव्यांग विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.
विद्यार्थ्यांच्या गरजेनुसार विशेष अध्यापन, समुपदेशन आणि आवश्यक थेरपीसारख्या सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर दिला जाणार आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील विशेष गरजा असलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या अधिक चांगल्या संधी उपलब्ध होतील. या पदांची भरती पवित्र पोर्टल आणि बाह्य यंत्रणेद्वारे करण्यात येणार आहे. त्यासाठी आवश्यक पात्रता निकष आणि भरती प्रक्रियेची माहिती लवकरच जाहीर होण्याची अपेक्षा आहे.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all








