
सिंधुदुर्ग : राजकारणात अनेक जण पदासाठी धडपडतात. आमदारकीची स्वप्नं पाहतात. सत्तेच्या खुर्चीसाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करतात. मात्र, काही माणसं अशी असतात, ज्यांच्यासाठी पदापेक्षा पक्ष मोठा असतो, सत्तेपेक्षा जनसेवा महत्त्वाची असते आणि राजकीय महत्त्वाकांक्षेपेक्षा लोकांचा विश्वास अधिक मोलाचा असतो. असंच एक नाव म्हणजे कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे जिल्हाप्रमुख दत्ता सामंत.
माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे निष्ठावंत कार्यकर्ते, आमदार निलेश राणे यांचे विश्वासू शिलेदार आणि राणे कुटुंबीयांच्या विश्वासातील व्यक्तिमत्त्व म्हणून दत्ता सामंत यांची ओळख आहे. ना कोणत्या पदाची अपेक्षा, ना आमदारकीचं स्वप्न. मात्र, जनतेच्या प्रश्नांसाठी आणि विकासकामांसाठी पायाला भिंगरी लावून फिरण्याचा त्यांचा ध्यास सध्या माणगाव खोऱ्यात चर्चेचा विषय ठरत आहे. आमदार निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली माणगाव खोऱ्यातील तब्बल २६ गावांमध्ये दत्ता सामंत सातत्याने जनसंपर्क साधत आहेत.
गावागावांत जाऊन लोकांच्या समस्या जाणून घेणे, स्थानिक कार्यकर्त्यांशी संवाद साधणे आणि विकासकामांसाठी पाठपुरावा करणे, यावर त्यांनी भर दिला आहे. विशेष म्हणजे, माणगाव खोरे हा ठाकरे गटाचे माजी आमदार वैभव नाईक यांचा प्रभाव असलेला परिसर मानला जातो. अशा राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या भागात दत्ता सामंत यांनी वाढवलेली सक्रियता आगामी राजकीय समीकरणांच्या दृष्टीनेही महत्त्वाची ठरत आहे. ठाकरे सेनेचे माजी आमदार वैभव नाईक यांच्या प्रभावक्षेत्रात दत्ता सामंत विकासकामांच्या माध्यमातून आपली पकड मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहेत.
माणगाव खोऱ्यात वाढवत आहेत जनसंपर्क
दत्ता सामंत माणगाव खोऱ्यातील गावागावांत फिरताना दिसत आहेत ग्रामस्थांशी संवाद साधताना, कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेताना दिसत आहेत. राजकारण म्हणजे केवळ निवडणुका नव्हे, राजकारण म्हणजे लोकांच्या अडचणीच्या वेळी त्यांच्या पाठीशी उभं राहणं. त्यांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी धावून जाणं आणि विकासाची कामं प्रत्यक्षात उतरवण्यासाठी प्रयत्न करणं. याच भूमिकेतून दत्ता सामंत माणगाव खोऱ्यातील गावागावांत पोहोचत आहेत. आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून स्थानिक प्रश्न सोडवण्यासाठी आणि विकासकामांना गती देण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. विशेष म्हणजे, कोणतेही लोकप्रतिनिधी पद नसतानाही त्यांनी जनतेशी जोडलेली नाळ कायम ठेवली आहे.
दुर्गम आंजिवडे गावात पोहचले दत्ता सामंत
माणगाव खोऱ्यातील अति दुर्गम भाग म्हणजे आंजिवडे गाव. दुर्गम रस्ते असलेल्या या गावात जात ग्रामस्थांशी संवाद साधत गावातील विकासकामांची पाहणी दत्ता सामंतांनी केली. माणगाव खोऱ्यातील अतिशय दुर्गम भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आंजिवडे गावातही दत्ता सामंत पोहोचले. दुर्गम भागातील लोकांचे प्रश्न समजून घेण्यासाठी आणि त्यांच्या समस्या मार्गी लावण्यासाठी त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला.
शहरापासून दूर असलेल्या अशा गावांपर्यंत पोहोचणं, तेथील लोकांच्या अडचणी समजून घेणं आणि त्या सोडवण्यासाठी आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून प्रयत्न करणं, हीच त्यांची कार्यपद्धती असल्याचं त्यांच्या या दौऱ्यातून दिसून येतं. कारण राजकारणात पद मिळालं की काम करायचं अशी त्यांची भूमिका नाही. तर पद असो वा नसो, लोकांसाठी काम करत राहायचं, हा त्यांचा प्रयत्न असल्याचं त्यांचे शिवसैनिक कार्यकर्ते सांगतात.
दत्ता सामंत यांचे माणगाव विविध गावांतील दौरे, ग्रामस्थांचा प्रतिसाद, कार्यकर्त्यांची उपस्थिती
कुडाळ-मालवण मतदारसंघातील राजकीय समीकरणांमध्ये माणगाव खोऱ्याला नेहमीच महत्त्वाचं स्थान राहिलं आहे. या भागात आपला जनसंपर्क वाढवण्यासाठी दत्ता सामंत यांनी सुरू केलेली धडपड आता लक्षवेधी ठरत आहे. एकीकडे आमदार निलेश राणे यांचे नेतृत्व, दुसरीकडे खासदार नारायण राणे यांच्यावरील निष्ठा आणि तिसरीकडे गावागावांतील जनतेशी थेट संपर्क. या त्रिसूत्रीच्या माध्यमातून दत्ता सामंत माणगाव खोऱ्यात संघटन मजबूत करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यामुळेच राजकीय वर्तुळात आता एक चर्चा रंगू लागली आहे. माणगाव खोऱ्यातील २६ गावांमध्ये दत्ता सामंतांची ही भिंगरीसारखी सुरू असलेली दौड आगामी काळात कोणती राजकीय समीकरणं बदलणार?
पदाची लालसा नाही, आमदारकीची महत्त्वाकांक्षा नाही. मात्र, जनतेच्या प्रश्नांसाठी सतत धावण्याची तयारी घेवून दत्ता सामंत फिरत आहेत. खासदार नारायण राणेंवरील निष्ठा, आमदार निलेश राणेंवरील विश्वास आणि माणगाव खोऱ्यातील जनतेसाठी काम करण्याची धडपड. या जोरावर दत्ता सामंत आपली वेगळी ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत.
सिंधुदुर्ग किल्ल्याच्या राजकारणात दत्ता तिथे सत्ता हे समीकरण गेले अनेक वर्ष प्रचलित आहेत. अशक्यप्राय मालवण नगरपालिका आमदार निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली एक हाती काबीज केल्यानंतर दत्ता सामंत यांनी विरोधकांना आपली ताकद दाखवून दिली. माणगाव खोऱ्यात गेले दहा वर्ष आमदार वैभव नाईक यांनी आमदारकीच्या रूपाने सत्तास्थाने भोगली. माणगाव खोराने प्रत्येक निवडणुकीत निर्णायक साथ वैभव नाईकांना दिली होती.
माणगाव खोरे ज्याच्या बाजूशी तोच येथील आमदारकी जिंकू शकतो हे राजकीय समीकरण आहे. हेच ओळखून दत्ता सामंत माणगाव खोऱ्यातच वैभव नाईक यांना जोरदार सुरूंग लावायला सुरुवात केली आहे. त्यामुळे दत्ता सामंत यांचा माणगाव खोऱ्यातील जनसंपर्क अतिशय दांडगा होत चाललेला पाहायला मिळत आहे. ही ठाकरे सेनेसाठी आणी आमदार वैभव नाईक यांच्यासाठी धोक्याची घंटा असून शिवसेनेसाठी एक दत्ता सामंतानी दिलेली नवसंजीवनी आहे.
आगामी काळात माणगाव खोऱ्यातील माणगाव, हळदीचे नेरूर, वसोली,आकेरी सारख्या महत्त्वाच्या ग्रामपंचायत निवडणूक होवू घातल्या आहेत. त्यामुळे दत्ता सामंत आतापासूनच मैदानात उतरल्याचे बोलले जात आहे. माणगाव खोऱ्यातील २६ गावांमध्ये सुरू असलेली ही जनसंपर्काची मोहीम दत्ता सामंतांना किती राजकीय बळ देणार? हे आगामी काळच ठरवेल. मात्र, सध्या तरी आमदार निलेश राणेंच्या नेतृत्वाखाली माणगाव खोऱ्यात दत्ता सामंतांची घोडदौड सुरूच आहे.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all








