LIVE UPDATES

आडेलीत विहिरीत पडून बिबट्याचा मृत्यू

दीड तास मृत्यूशी झुंज देऊनही बिबट्याचा अंत : प्रविण गडेकर, समीर नाईक यांचा वनविभागाच्या हलगर्जीपणावर आरोप
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: November 17, 2026 10:23 AM
views 349  views

वेंगुर्ला : आडेली-खुटवळवाडी येथे भरवस्तीत असलेल्या विहिरीत पडलेल्या बिबट्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. सोमवारी रात्री सुमारे ११.४५ वाजल्यापासून तब्बल दीड तास हा बिबट्या विहिरीतील पाण्यातून बाहेर पडण्यासाठी धडपडत होता. मात्र, वनविभागाकडे तातडीने बचावकार्य करण्यासाठी आवश्यक यंत्रणा उपलब्ध नसल्याने वेळेत मदत मिळू शकली नाही आणि अखेर बिबट्याला आपला जीव गमवावा लागला.

वनविभागाच्या हलगर्जीपणामुळेच ही घटना घडल्याचा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्ते प्रविण गडेकर व मठ येथील सामाजिक कार्यकर्ते समीर नाईक यांनी केला आहे.

आडेली-खुटवळवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते प्रविण गडेकर यांच्या घराशेजारी ही विहीर आहे.

ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, झाडावर बसलेल्या कोंबड्यांची शिकार करण्यासाठी बिबट्याने झडप मारली. मात्र, शिकार करण्याच्या प्रयत्नात त्याचा तोल जाऊन तो थेट विहिरीत पडला. सोमवारी रात्री ११.४५ च्या सुमारास ही घटना घडली.

घटनेची माहिती मिळताच मठ वनविभागाशी संपर्क साधण्यात आला. त्यानंतर वनविभागाचे तीन कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. मात्र, बिबट्याला सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी आवश्यक असलेली कोणतीही तातडीची बचाव यंत्रणा त्यांच्याकडे उपलब्ध नव्हती.

दरम्यान, बिबट्या पाण्यातून बाहेर पडण्यासाठी सातत्याने धडपडत होता. त्याला दीर्घकाळ पाण्यात पकड करण्यासाठी काही उपलब्ध नव्हते. त्यानंतर रात्री सुमारे १.१५ वाजण्याच्या सुमारास वनविभागाची दुसरी टीम पिंजरा घेऊन घटनास्थळी दाखल झाली. मात्र, तोपर्यंत उशीर झाला होता. पाण्यातून बाहेर पडण्यासाठी संघर्ष करत असतानाच बिबट्याचा मृत्यू झाला.

यानंतर मालवण येथील स्कुबा डायव्हिंग पथकाला पाचारण करण्यात आले. या पथकाच्या मदतीने मृत बिबट्याला विहिरीतून बाहेर काढण्यात आले. मृत बिबट्या अंदाजे १० ते १२ वर्षांचा असल्याची माहिती स्थानिक ग्रामस्थांनी दिली.

तातडीची बचाव यंत्रणा असती तर बिबट्याचे प्राण वाचले असते!

या घटनेवर प्रतिक्रिया देताना प्रविण गडेकर व समीर नाईक यांनी वनविभागाच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली. वन्यप्राणी विहिरीत किंवा अन्य ठिकाणी अडकल्यास त्यांना वाचवण्यासाठी वनविभागाकडे तातडीने वापरता येईल अशी आवश्यक बचाव यंत्रणा असणे गरजेचे आहे.

मात्र, प्रत्यक्ष घटनेच्या वेळी अशी यंत्रणा उपलब्ध नसल्याने बिबट्याला वेळेत मदत मिळू शकली नाही. वनविभागाकडे आवश्यक साधनसामग्री असती तर या बिबट्याचे प्राण निश्चितच वाचवता आले असते, असा आरोप त्यांनी केला. 

यावेळी घटनास्थळी जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते प्रकाश गडेकर, तात्या कोंडसकर, तेजस शेणई, काकू नाईक, माजी सरपंच सुनील गडेकर, संदेश सुकळवाडकर यांच्यासहित ग्रामस्थ उपस्थित होते.

सध्या सावंतवाडी, वेंगुर्ला तालुक्यात ओंकार हत्तीचे वास्तव्य असल्याने वनविभागाचे मनुष्यबळ त्याठिकाणी असते. यामुळे अपूर्ण मनुष्यबळ असल्याने उशीर झाल्याचे त्याठिकाणी उपस्थित काही वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सांगितले असल्याचे समीर नाईक यांनी सांगितले.


ताजी बातमी

View all

मालवणच्या आनंदव्हाळ-भोसलेवाडीत नळपाणी योजनेच्या कामानंतर उघडे चर
November 17, 2026
Bhuvanesh Malkar from Karivade village in Sawantwadi, who worked as a Prep Artist on the Ramayana and Toxic films through DNEG.
Ramayana Movie : 'रामायण’च्या भव्य निर्मितीत सावंतवाडीच्या सुपुत्राची झेप
November 17, 2026
सिंधुदुर्गात '१७ मराठा रुईवा परिवाराचा' ६४ वा रेजिंग डे उत्साहात साजरा
November 17, 2026
Nitesh Rane Meets Deepak Kapoor Over Sindhudurg Flight Connectivity
Sindhudurg Navi Mumbai Flight Service : चिपी–नवी मुंबई विमानसेवा सुरू
November 17, 2026
संबंधित बातम्या

View all

मालवणच्या आनंदव्हाळ-भोसलेवाडीत नळपाणी योजनेच्या कामानंतर उघडे चर
November 17, 2026
Bhuvanesh Malkar from Karivade village in Sawantwadi, who worked as a Prep Artist on the Ramayana and Toxic films through DNEG.
Ramayana Movie : 'रामायण’च्या भव्य निर्मितीत सावंतवाडीच्या सुपुत्राची झेप
November 17, 2026
सिंधुदुर्गात '१७ मराठा रुईवा परिवाराचा' ६४ वा रेजिंग डे उत्साहात साजरा
November 17, 2026
न्यायालयीन कर्मचारी बेमुदत संपावर
November 17, 2026