LIVE UPDATES

मुक्ताई ॲकेडमीच्या प्रशिक्षण शिबीराला मोठा प्रतिसाद

Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: July 02, 2026 18:21 PM
views 22  views

सावंतवाडी : मुक्ताई ॲकेडमीने सावंतवाडी येथे पाच वर्षापासून पुढील मुलांसाठी व मुलींसाठी एक दिवसाच्या कॅरम आणि बुद्धिबळ प्रशिक्षण शिबीराचे आयोजन केले होते. खासकीलवाडा येथील पाटणकर वाड्यातील मुक्ताई ॲकेडमीच्या प्रशिक्षण केंद्रात शिबीराचे आयोजन करण्यात आले. या शिबीरात तब्बल सत्त्याण्णव मुलांनी आणि मुलींनी सहभाग घेतला. 

सावंतवाडी, कुडाळ, दोडामार्ग आणि कणकवली येथील विदयार्थ्यांनी या प्रशिक्षणाचा लाभ घेतला. प्रशिक्षण शिबीराचे उदघाटन कणकवली येथील सॉफ्टवेअर उदयोजक प्रवीण सोनार यांच्या हस्ते करण्यात आले. सर्वप्रथम मुक्ताई ॲकेडमीचे अध्यक्ष कौस्तुभ पेडणेकर यांनी ॲकेडमीच्या दहा वर्षातील कार्याचा आढावा घेतला. प्रवीण सोनार यानी गेली दहा वर्षे मुक्ताई ॲकेडमी, कॅरम आणि बुदधिबळ खेळातील मुलांसाठी घेत असलेल्या उपक्रमांसाठी कौस्तुभ पेडणेकर यांचे कौतुक केले. कॅरम व बुद्धिबळ प्रशिक्षणाचा विद्यार्थ्यांनी लाभ घेण्याचे देखील त्यांनी आवाहन केले. ॲकेडमीच्या अनेक विदयार्थ्यांनी राष्ट्रीय स्तरावर मिळवलेलं यश आणि मुक्ताई ॲकेडमीला मिळालेला "बेस्ट ॲकेडमी" पुरस्कार जिल्ह्यासाठी अभिमानास्पद असल्याचं सोनार यांनी यावेळी नमूद केलं. शिबीरात कौस्तुभ पेडणेकर यांनी कॅरम आणि बाळकृष्ण पेडणेकर याने बुदधिबळ खेळाचे विदयार्थ्यांना प्राथमिक प्रशिक्षण देऊन शालेय व इतर स्पर्धा आणि त्याचे होणारे फायदे याविषयी मार्गदर्शन केले. 

विशेष म्हणजे कणकवली येथून आलेल्या राज्यस्तरीय कॅरम खेळाडू जान्हवी सोनार हीचा यावेळी सत्कार करण्यात आला. तसेच मुक्ताई ॲकेडमीचा जिल्ह्यातील पहिला बुदधिबळ राज्य पंच - आर्बिटर, बाळकृष्ण पेडणेकर याचा सत्कार करण्यात आला. विदयार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात आली. कौस्तुभ पेडणेकर यांनी लवकरच तालुकास्तरीय आणि जिल्हास्तरीय बुदधिबळ स्पर्धा घेण्यात येणार असल्याचे जाहीर केले