LIVE UPDATES

अहमदाबाद येथे 2030 मध्ये होणार राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचे आयोजन

भारताला सोपविण्यात आली बॅटन
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: August 04, 2026 17:55 PM
views 72  views
glasgow closing ceremony flag handover

नवी दिल्ली : ग्लासगो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेची सांगता रविवारी झाली. यावेळी भारताने जगातील सर्व राष्ट्रकुल देशांना अहमदाबाद येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी येण्याचे निमंत्रण दिले आहे. रविवारी झालेल्या समारोप सोहळ्यात, ग्लासगोने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेची मशाल अधिकृतपणे स्कॉटलंडकडून भारताकडे हस्तांतरित करण्यात आली. समारोपाच्या कार्यक्रमात भारताचे प्राचीन तत्त्वज्ञान, आधुनिक कला आणि सांस्कृतिक वैभव यांचा एक अनोखा संगम पाहायला मिळाला. 

किंग चार्ल्स तिसरे यांचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित असलेल्या प्रिन्स एडवर्ड यांनी या स्पर्धांची सांगता झाल्याची अधिकृत घोषणा केली. यावेळी ते म्हणाले, "सर्वांनी स्पर्धांचे आयोजन केले आणि त्या स्पर्धेला पाठिंबा दिला, त्याबद्दल सर्वांचे आभार. आज तुम्ही राष्ट्रकुलची भावना आणि मूल्ये पुन्हा एकदा जिवंत केली आहेत. धन्यवाद, ग्लासगो." ते पुढे म्हणाले, "मी सर्व राष्ट्रे आणि प्रदेशांमधील खेळाडूंना भारतातील अहमदाबाद येथे येण्याचे निमंत्रण देतो, जिथे चार वर्षांनंतर २४ वी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा जी या स्पर्धेची शताब्दी आवृत्ती देखील असेल ती आयोजित केली जाईल."

महिलांच्या ५७ किलो बॉक्सिंग गटात सुवर्णपदक जिंकणाऱ्या जस्मिन लंबोरिया हिने समारोप सोहळ्यात भारताच्या ध्वजवाहकाची भूमिका बजावली. क्रीडांगणावर राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांच्या ध्वजाच्या प्रतिकात्मक मिरवणुकीने ध्वज हस्तांतरणाची अधिकृत प्रक्रिया सुरू झाली. स्कॉटलंड आणि भारताच्या ध्वजवाहकांच्या नेतृत्वाखालील या मिरवणुकीत स्पर्धांचा ध्वज खाली उतरवण्यात आला. त्यानंतर, ग्लासगोच्या लॉर्ड प्रोवोस्ट जॅकलीन मॅकलरेन यांनी हा ध्वज सुसान जॅक्सन, एमिली निकोल, डॉ. डोनाल्ड रुकारे, नीरज चोप्रा, पी.टी. उषा आणि शेवटी हर्ष संघवी यांच्याकडे सोपवला. त्यानंतर समारंभाचे रूपांतर भारताच्या सांस्कृतिक वारशाच्या उत्सवात झाले. भारताचे सादरीकरण तीन भागांत पार पडले; या प्रवासाचे वर्णन आयोजकांनी सामायिक मूल्ये, संस्कृती आणि परस्पर बंधांचा उत्सव असे केले.