
कुडाळ : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या सावंतवाडी आणि कुडाळ विधानसभा मतदारसंघातील सिंधुदुर्ग महिला आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक आज कुडाळ एमआयडीसी शासकीय विश्रामगृह येथे पार पडली. या बैठकीत आगामी रणनीती आणि महिला संघटना बळकटीकरणावर विशेष चर्चा करण्यात आली.
या बैठकीला कुडाळ-मालवणचे माजी आमदार तथा शिवसेना जिल्हाप्रमुख वैभव नाईक आणि महिला जिल्हाप्रमुख श्रेया परब यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी वैभव नाईक यांनी पदाधिकाऱ्यांकडून महिला संघटनेच्या कामाचा सविस्तर आढावा घेतला.
महिलांनी संघटित होऊन प्रश्नांवर लढा द्यावा - वैभव नाईक
मार्गदर्शन करताना माजी आमदार वैभव नाईक म्हणाले, "महिला पदाधिकाऱ्यांनी तालुकानिहाय दौरे करून महिलांच्या बैठका घ्याव्यात आणि संघटना अधिक मजबूत करावी. रिक्त असलेल्या पदांवर नवीन महिला पदाधिकाऱ्यांची नावे सुचवावीत, त्यांची तातडीने निवड केली जाईल. तसेच महिलांच्या प्रश्नांवर नेहमी आवाज उठवा आणि त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रसंगी संघर्ष करा, त्यासाठी मी आपल्या पाठीशी ठामपणे उभा आहे."
महिला जिल्हाप्रमुख श्रेया परब यांनी सांगितले की, "महिला कुठल्याही क्षेत्रात कमी नाहीत. शिवसेना पक्षाने नेहमीच महिलांचा मान-सन्मान राखला असून, महिलांना नेतृत्वाची संधी दिली आहे. चांगले काम करणाऱ्या महिलांना भविष्यात विविध पदांवर काम करण्याची संधी मिळू शकते. यासाठी महिला पदाधिकाऱ्यांनी संघटनेच्या विस्तारासाठी आणि महिलांच्या समस्या सोडवण्यासाठी कायम कार्यरत राहावे व नवीन महिलांना संघटनेत जोडावे."
या बैठकीत महिला आघाडीच्यावतीने काही महत्त्वाच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या. माजी आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते नवनिर्वाचित म्हणून दिपश्री नेरुरकर कुडाळ महिला संघटक, सावंतवाडी तालुका संघटक श्रुतिका दळवी, वेंगुर्ले शहर संघटक कोमल सरमळकर यांना पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.
या बैठकीस दोडामार्ग उपजिल्हा संघटक विनिता घाडी, सावंतवाडी तालुका संघटक भारती कासार व नम्रता झारापकर, सावंतवाडी विधानसभा संघटक सुकन्या नरसुले, वेंगुर्ले तालुका संघटक साक्षी चमणकर, वेंगुर्ले विभागप्रमुख लक्ष्मी पेडणेकर, पिंगुळी विभागप्रमुख निर्मला पालकर यांच्यासह मोठ्या संख्येने महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.











