LIVE UPDATES

अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी २३ वर्षीय तरुणाला अटक

Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: August 26, 2026 20:13 PM
views 181  views

वैभववाडी : तालुक्यातील एका गावात १५ वर्षीय अल्पवयीन मुलीशी अश्लील वर्तन करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी २३ वर्षीय तरुणाविरोधात पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी त्याला अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित अल्पवयीन मुलगी मंगळवारी (ता. २५) रात्री आठच्या सुमारास घराच्या अंगणात बसली होती. त्यावेळी शेजारी राहणारा संशयित तरुण तेथे आला. त्याने मुलीशी अश्लील वर्तन करण्याचा प्रयत्न केला. घाबरलेल्या मुलीने आरडाओरड केल्यानंतर घरातील कामात व्यस्त असलेली तिची आई तातडीने बाहेर आली. आईला पाहताच संशयित तरुण तेथून पसार झाला.

घटनेनंतर मुलगी व तिच्या आईने तातडीने वैभववाडी पोलीस ठाणे गाठून संबंधित तरुणाविरोधात तक्रार दाखल केली. तक्रारीनंतर पोलिसांनी पोक्सो कायद्यान्वये गुन्हा नोंदविला. पोलीस निरीक्षक मनोज सोनवलकर व पोलीस उपनिरीक्षक उल्हास जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तत्काळ तपासाची चक्रे फिरवत संशयित तरुणाचा शोध घेतला. त्याला अटक करून आज जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले.

न्यायालयाने त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक उल्हास जाधव करीत आहेत.