
सिंधुदुर्ग : पत्रादेवी येथील सत्याग्रहाने गोवा हा भारताचा अविभाज्य भाग आहे हा संदेश दिला गेला. देशाच्या विविध भागांतून आलेल्या लोकांनी गोवा मुक्तीसाठी खांद्याला खांदा लावून संघर्ष केला, प्राणांची आहुती दिली. त्यामुळे हा सत्याग्रह हा केवळ एक आंदोलन नव्हते तर भारतीय एकात्मता आणि राष्ट्रीय ऐक्याचे प्रतिक होते, असे मत केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केले. पत्रादेवी 'हुतात्मा स्मृती स्मारका'च्या लोकार्पण प्रसंगी ते बोलत होते.
मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते हुतात्मा स्मृती स्मारकाचे लोकार्पण झाले. याप्रसंगी गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक, खासदार सदानंद तानावडे, पर्यटनमंत्री रोहन खंवटे, समाज कल्याणमंत्री सुभाष फळदेसाई, आमदार प्रवीण आर्लेकर, आमदार जीत आरोलकर, आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये, सिंधुदुर्गचे जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे आदींसह मान्यवरांची विशेष उपस्थिती होती. शहीदांच्या कुटुंबियांची या ठिकाणी विशेष उपस्थिती होती.
मंत्री सिंह म्हणाले की,' गोव्यात येणे नेहमीच समाधानकारक असते. निवडणुकीच्या काळात आणि अनेक प्रसंगी जाहीर सभांसाठी गोव्यात आलो. परंतु, अशा स्मारकाचे उद्घाटन करण्याची संधी मिळेल असा विचार मी कधी केला नव्हता. गोवा मुक्ती संग्रामादरम्यान पोर्तुगीजवटीविरुद्ध लढा देणाऱ्या आणि आपल्या प्राणांचे सर्वोच्च बलिदान देणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांना यानिमित्ताने मी श्रद्धांजली अर्पण करतो. गोवा मुक्तिसंग्रामात देशाच्या कानाकोपऱ्यातील नागरिकांनी एकजुटीने सहभाग घेतला.
पत्रादेवी सत्याग्रह हा भारताच्या एकतेचे प्रतिक होता. गोवा मुक्तीसाठी पोर्तुगीज राजवटीविरोधात लढण्यासाठी पत्रादेवी येथे देशभरातून हजारो स्वातंत्र्यसैनिक एकत्र आले होते. गोवा मुक्तिसंग्राम हा केवळ गोव्यापुरता मर्यादित नव्हता. तर देशाच्या विविध भागांतील स्वातंत्र्यसैनिकांनी त्यात सहभाग घेतला होता. पत्रादेवी हुतात्मा स्मृती स्मारकावर गोवा मुक्तिसंग्रामात बलिदान दिलेल्या हुतात्म्यांची नावे कोरण्यात आली आहेत. या हुतात्म्यांचे बलिदान गोव्याच्या मुक्तीच्या सांगितले असून इतिहासातील महत्त्वपूर्ण अध्याय असल्याचे त्यांनी नमूद केले.

काँग्रेसच्या काळात गोवा मुक्तीला महत्व दिले नाही : मुख्यमंत्री डॉ. सावंत
याप्रसंगी मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले, काँग्रेसच्या राजवटीत गोवा मुक्ती आंदोलनापेक्षा आंतरराष्ट्रीय संबंधांना अधिक महत्त्व दिले गेले. यामुळेच गोवा मुक्ती संग्रामात भाग घेतलेल्या देशभरातील स्वातंत्र्यसैनिकांना काँग्रेसच्या काळात योग्य ती ओळख व सन्मान मिळाला नाही. देशाचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या कार्यकाळातच या स्वातंत्र्यसैनिकांच्या योगदानाची दखल घेऊन त्यांना योग्य तो सन्मान देण्यात आला. महाराष्ट्राच्या सीमेवर असणारे हे स्मारक केवळ गोव्यासाठीच नव्हे तर संपूर्ण देशासाठी प्रेरणादायी आहे.
गोव्याचा स्वातंत्र्यलढा १९४६ च्या आंदोलनाआधीच सुरू झाला होता. कुडचडे किंवा मडगाव आंदोलनाआधी, १५८३ मधील ऐतिहासिक 'कुंकळ्ळी बंडापासून' गोमंतकीयांनी परकीय सत्तेविरुद्धचा लढा सुरू केला होता. गोव्याच्या मुक्तिसंग्रामात सहभागी होण्यासाठी देशभरातून आलेल्या एकत्र जमलेल्या सत्याग्रहींच्या स्मृतीप्रीत्यर्थ हे स्मारक उभारण्यात आले आहे. १५ ऑगस्ट १९५५ हा बलिदान दिवस पाळला जातो.
गोव्याच्या मुक्तिसंग्राम लढ्यात निःशस्त्र सत्याग्रहींची पहिली तुकडी पत्रादेवी येथे दाखल झाली होती. शांततापूर्ण सत्याग्रहासाठी भारतभरातून दोन हजारांहून अधिक सत्याग्रही त्या दिवशी पत्रादेवी येथे जमा झाले. पोर्तुगीज सैन्याने या सत्याग्रहींवर केलेल्या अंधाधुंद गोळीबारात सुमारे ७७ सत्याग्रहींनी आपल्या प्राणांची आहुती दिली. गोवा मुक्तीसाठी आलेले माघारी जाऊ शकले नाही. आज देश अन् गोवा त्यांचे स्मरण करत आहे अशी भावना श्री. सावंत यांनी व्यक्त केली.











