
वैभववाडी : खारेपाटण-भुईबावडा-गगनबावडा मार्गावरील अपघाती वळणावर वारंवार होणारे अपघात लक्षात घेऊन पालकमंत्री नितेश राणे यांच्या आदेशानुसार तातडीने विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. शनिवारी याच ठिकाणी अपघात झाल्यानंतर भाजपा तालुकाध्यक्ष सुधीर नकाशे यांनी या ठिकाणी आवश्यक सुरक्षा उपाययोजना करण्याची मागणी केली होती. त्यानंतर प्रशासनाने तत्परतेने कार्यवाही केली आहे.
या मार्गावरील जामदा पुलानजीक वळणावर अनेक अपघात होत असत. या अपघाती वळणावर वाहनांचा वेग नियंत्रित करण्यासाठी स्पीडब्रेकर बसविण्यात आले आहेत. तसेच वाहनचालकांना धोकादायक वळणाची माहिती मिळावी यासाठी ‘अपघाती वळण’ अशा आशयाचे सूचना फलक लावण्यात आले आहेत.
वळणाच्या दोन्ही बाजूंना वाढलेली झाडी-झुडपे तोडून रस्त्याचे व्हिजन क्लिअर करण्यात आले आहे. त्यामुळे समोरून येणारी वाहने वाहनचालकांना स्पष्टपणे दिसण्यास मदत होणार असून अपघाताचा धोका कमी होण्याची अपेक्षा आहे.
या वळणावर यापूर्वीही वारंवार अपघात घडले आहेत. शनिवारी झालेल्या अपघातानंतर हा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला होता. भाजपा तालुकाध्यक्ष सुधीर नकाशे यांनी पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडे तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली होती. त्यांच्या मागणीची दखल घेत पालकमंत्र्यांनी प्रशासनाला तत्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश दिले.
पालकमंत्री नितेश राणे यांच्या आदेशानंतर अवघ्या काही दिवसांत करण्यात आलेल्या या उपाययोजनांमुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना मोठा दिलासा मिळाला आहे.











