LIVE UPDATES

‘उमेद’च्या माध्यमातून महिला आर्थिक सक्षमीकरणास प्राधान्य

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवी चालना मिळणार
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: August 26, 2026 20:59 PM
views 51  views

मुंबई : ग्रामीण महिलांना केवळ बचत गटांपुरते मर्यादित न ठेवता त्यांना शेती, व्यवसाय आणि उद्योजकतेच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्थात ‘उमेद’च्या माध्यमातून सुरू आहे. आधुनिक शेती तंत्रज्ञान, कृषी निविष्ठांची उपलब्धता आणि विविध व्यवसायांच्या माध्यमातून ग्रामीण महिलांना शाश्वत उत्पन्नाचे साधन मिळत असून, त्यांच्या आर्थिक स्वावलंबनाला नवी दिशा मिळत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

‘उमेद’अंतर्गत २०२४-२५ व २०२५-२६ या कालावधीत राज्यातील ३४ जिल्ह्यांमधील ३५१ तालुक्यांत ४०८ कृषी अवजार बँका स्थापन करण्यात आल्या असून, सुमारे ४० हजार ८०० महिला शेतकऱ्यांना त्याचा लाभ झाला आहे. या बँकांमधून ट्रॅक्टरसह विविध कृषी अवजारे भाडेतत्त्वावर उपलब्ध करून दिली जात असल्याने महागडी यंत्रसामग्री खरेदीचा खर्च कमी होऊन शेतीतील यांत्रिकीकरणाला चालना मिळत आहे.

कृषी निविष्ठांच्या क्षेत्रातही ‘उमेद’च्या माध्यमातून महिलांना संधी उपलब्ध झाली असून, राज्यातील ५४ महिला शेतकरी उत्पादक कंपन्यांकडे बियाणे व खत विक्रीसाठी आवश्यक परवाने आहेत. या माध्यमातून सुमारे ५४ हजार महिला सभासदांना सेवा दिली जात आहे.

महिला उत्पादक कंपन्या सामूहिक मागणीच्या आधारे बियाणे, खते व अन्य कृषी निविष्ठांची खरेदी करून त्या योग्य दरात आणि वेळेत उपलब्ध करून देत आहेत. कृषी क्षेत्रासोबतच रेशन दुकाने, सिमेंट एजन्सी, वीट निर्मिती, केरोसीन एजन्सी आणि टाईल्स निर्मिती यांसारख्या व्यवसायांमध्येही महिला कार्यरत आहेत.

३२ स्वयं-सहाय्यता समूहांमधील ५८ महिला रेशन दुकाने, एका समूहातील २३ महिला सिमेंट विक्री, दोन समूहांमधील २४ महिला वीट निर्मिती व्यवसाय सांभाळत असून, दोन महिला केरोसीन एजन्सी व दोन महिला टाईल्स निर्मितीचा व्यवसाय चालवत आहेत.

‘उमेद’च्या माध्यमातून ग्रामीण महिलांचा प्रवास बचत व कर्जाच्या चौकटीपलीकडे जाऊन उद्योजकतेकडे होत आहे. व्यवसाय व्यवस्थापन, वित्तीय समावेशन आणि बाजारपेठेशी जोडणी यासाठी संस्थात्मक पाठबळ मिळत असल्याने महिलांची निर्णयक्षमता व आर्थिक स्वावलंबन वाढत आहे.

ग्रामीण भागात रोजगार व नियमित उत्पन्नाच्या संधी निर्माण होत असून, स्थानिक नागरिकांनाही आवश्यक वस्तू व सेवा गावपातळीवर उपलब्ध होत आहेत. महिला स्वयंसहाय्यता समूहांची सामूहिक ताकद, आधुनिक कृषी तंत्रज्ञान आणि उद्योजकतेला मिळणारे संस्थात्मक पाठबळ यांचा संगम घडवून ‘उमेद’ अभियान ग्रामीण महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याबरोबरच ग्रामीण अर्थव्यवस्थेलाही नवी चालना देत आहे.