LIVE UPDATES

Kudal Malvan News : कुडाळ-मालवण मतदारसंघ विकासासाठी आमदार निलेश राणेंचा लेखाजोखा

शिवसेनेत 'एक व्यक्ती, एक पद' धोरणासह संघटनात्मक पुनर्रचना सप्ताह ; काका कुडाळकर यांची सिंधुदुर्ग जिल्हा शिवसेना सचिवपदी वर्णी
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: November 23, 2026 02:56 PM
views 30  views
#kokansadlive#news update#konkan update# breaking news#

कुडाळ :  कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार निलेश राणे यांच्या आमदारकीला दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे. या दोन वर्षांच्या कालखंडात जनतेचे प्रलंबित प्रश्न सोडवण्यासह मतदारसंघाचा सर्वांगीण विकास साधण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत आ. निलेश राणे यांच्या कार्यकाळाचा आढावा घेण्यासोबतच शिवसेनेच्या संघटनात्मक पुनर्रचनेची आणि नवीन नियुक्त्यांची महत्त्वाची घोषणा करण्यात आली.

या पत्रकार परिषदेला शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, उपजिल्हाप्रमुख अरविंद करलकर, काका कुडाळकर, दिनेश साळगावकर, सभापती मिलिंद नाईक, संजय भोगटे यांच्यासह विविध पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

आमदार निलेश राणे यांच्या आमदारकीच्या दोन वर्षांच्या प्रवासात पक्षीय मतभेद बाजूला ठेवून केवळ सर्वसामान्य जनतेच्या हिताला प्राधान्य देण्यात आल्याचे पत्रकार परिषदेत नमूद करण्यात आले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दाखवलेला विश्वास सार्थकी ठरवत आ. राणे यांनी मतदारसंघाला विकासाच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न केला आहे.

या कालावधीत मतदारसंघातील अनेक जटिल आणि जिव्हाळ्याचे प्रश्न मार्गी लावण्यात आल्याचा दावा करण्यात आला. त्यामध्ये प्रामुख्याने दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या आकारीपडच्या मुद्द्याचे लवकरात लवकर निरसन होण्यासाठी विशेष व सातत्यपूर्ण प्रयत्न करण्यात आले.

वन विभागाशी संबंधित अडचणी तसेच मच्छीमार बांधवांच्या विविध समस्या सोडवण्यासाठी ठोस पावले उचलण्यात आली. कोकणच्या लोककला परंपरेचा अविभाज्य भाग असलेल्या दशावतार कलाकारांच्या समस्या व मागण्या मार्गी लावण्यासाठी प्रयत्न झाले.

शिवसेनेची संघटना गाव पातळीपर्यंत अधिक भक्कम व सक्रीय करण्यासाठी पक्षाच्या वतीने २६ नोव्हेंबर ते १ डिसेंबर या कालावधीत 'पुनर्रचना सप्ताह' आयोजित करण्यात आला आहे. या मोहिमेअंतर्गत संघटनेत मोठे बदल घडवून आणले जाणार असून, यापुढे पदांचे वाटप करताना पक्षाच्या 'एक व्यक्ती, एक पद' या धोरणाची काटेकोर अंमलबजावणी केली जाणार आहे. त्यामुळे एकाच व्यक्तीकडे अनेक पदे न राहता नवीन व कार्यक्षम कार्यकर्त्यांना संधी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

जिल्हा सचिवपदी काका कुडाळकर; ९ जिल्हा परिषद विभाग प्रमुखांची घोषणा

आ. निलेश राणे यांच्या आदेशानुसार सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष काका कुडाळकर यांची सिंधुदुर्ग जिल्हा शिवसेना सचिव पदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या अनुभवाचा फायदा जिल्ह्यातील पक्ष संघटनेला होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

याचबरोबर मतदारसंघातील नऊ विभागांसाठी जिल्हा परिषद मतदारसंघ प्रभारी (विभाग प्रमुख) यांची नावे जाहीर करण्यात आली आहेत आंब्रड: देवेंद्र नाईक, माणगाव: दिनेश साळगावकर, तेंडोली: आनंद शिरवलकर, वेताळ बांबर्डे: मिलिंद नाईक, नेरूर: अरविंद करलकर, ओरोस: निखिल कांदळगावकर, पावशी: संजय भोगटे, घावनाळे: दत्ता कोरगावकर, पिंगुळी: अनिकेत तेंडुलकर यांची नवीन नियुक्ती करण्यात आली असून, नवनियुक्त विभाग प्रमुख पुनर्रचना सप्ताहादरम्यान प्रत्यक्ष गावांमध्ये जाऊन बूथ बैठका घेणार असून, बूथस्तरावर संघटनेची बांधणी पूर्ण करणार आहेत.

या बदलांनंतर आता तालुका प्रमुख आणि शहर प्रमुख पदांवर नवीन चेहऱ्यांना संधी मिळणार की जुनेच पदाधिकारी कायम राहणार, याकडे राजकीय वर्तुळाचे व कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.