
सिंधुदुर्ग : दोन-अडीच महिन्यांपासून आपल्या कुटुंबापासून दुरावलेला 'ओंकार' हत्ती आता पुन्हा आपल्या आई आणि बहिणींच्या जवळ पोहोचला आहे... दोडामार्ग तालुक्यातील केर गावाजवळील जंगलात ओंकार आणि त्याची आई माही यांचं मनोमिलन होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
विशेष म्हणजे, ओंकारच्या शोधात त्याची आई माही आणि दोन लहान पिल्लं बांबर्डे परिसरातून केरच्या जंगलात दाखल झाली आहेत... घनदाट जंगलात या हत्तींचं नेमकं लोकेशन शोधण्याचं आव्हान वनविभागासमोर असलं, तरी अडीच महिन्यांनंतर या कुटुंबाची भेट घडण्याची आशा निर्माण झाली आहे... काय आहे ओंकारच्या कुटुंबाची ही कहाणी?
आपल्या कळपापासून अडीच महिने दूर...
आपल्या कळपापासून वेगळा झालेला ओंकार... गेल्या दोन-अडीच महिन्यांपासून जंगलात आणि गावागावात सावंतवाडी,वेंगुर्ले आणि कुडाळ तालुक्यात स्वतंत्रपणे भटकंती करत आहे.
दोडामार्ग तालुक्यातील परमे गावात तो रात्री दाखल झाला.या परिसरात त्याच्या हालचाली सुरू असताना, आता ओंकार दोडामार्ग तालुक्यातील केर गावाजवळील परमे जंगलात पोहोचला आहे... आणि याच दरम्यान त्याची आई माही आणि दोन लहान पिल्लंही ओंकारच्या शोधात केर परिसरात दाखल झाली आहेत...त्यामुळे ओंकार आणि त्याच्या कुटुंबाच्या आज किंवा येत्या दोन चार दिवसात भेटीची शक्यता अधिक बळावली आहे...ओंकारच्या हत्ती कुटुंबाची कहाणीही तितकीच रंजक आहे...
काय आहे ओंकारच कुटुंब
या कुटुंबात नर हत्ती बाहुबली आणि मादी हत्तीण माही असून, त्यांना एकूण चार पिल्लं आहेत... यातील पहिली जुळी पिल्लं म्हणजे ओंकार आणि त्याची बहीण गौरी... मात्र, सध्या गौरी आपल्या वडील बाहुबलीसोबत चंदगडच्या दिशेने गेली असून चंदगड जंगलात आहे ... तर माहीसोबत तिची अन्य दोन लहान पिल्लं आहेत.
हीच माही आणि तिची दोन पिल्लं आता ओंकारच्या शोधात केरच्या जंगलात पोहोचल्याची माहिती समोर आली आहे...ठाकरे सेनेचे रूपेश राऊळ यांनी या जंगली हत्तींना सुरक्षित जंगलात सोडण्याची मागणी केली आहे.
आजचा दिवस महत्त्वपूर्ण
ओंकार आणि त्याची आई माही हे दोघेही केर गावाच्या परिसरातील जंगलात जवळपास असल्याची माहिती वनविभागाकडून मिळत आहे... मात्र, हा परिसर घनदाट जंगलाचा असल्याने हत्तींचं नेमकं लोकेशन शोधणं आणि त्यांच्या नैसर्गिक हालचालींचा मागोवा घेणं वनविभागासाठी आव्हानात्मक ठरत आहे.
अडीच महिन्यांनंतर आई आणि मुलाची भेट घडण्याची ही शक्यता वन्यजीवप्रेमींसाठीही उत्सुकतेचा विषय बनली आहे... नागरिकांनी हत्तींच्या परिसरात गर्दी करू नये आणि त्यांच्या हालचालींमध्ये अडथळा निर्माण करू नये, असं आवाहन करण्यात येत आहे... आता केरच्या जंगलात ओंकार जातो का? आणि त्याची आई माही यांचं मनोमिलन होतं का? याकडे दोडामार्गसह संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याचं लक्ष लागलं आहे...
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all








