LIVE UPDATES

Sawantwadi News : कास ग्रामविकास संस्थेचा दुसरा स्नेहमेळावा उत्साहात

गावाच्या मातीचा सुगंध अन् माणुसकीच्या नात्यांचा हा उत्सव : विशाल परब
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: November 23, 2026 03:30 PM
views 12  views
#kokansadlive#news update#konkan update# breaking news#Sawantwadi News

सावंतवाडी : गावापासून अंतर कितीही असले, तरी मनाच्या गाभाऱ्यात जपलेली गावची माती आणि माणसांशी जोडलेली नाती कधीच दूर होत नाहीत. याच गावप्रेमाच्या भावबंधांना नवसंजीवनी देणारा कास ग्राम विकास संस्था, मुंबईचा दुसरा स्नेहमेळावा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या स्नेहमेळाव्याचे औचित्य साधून संस्थेच्या ‘KGVS दिनदर्शिका २०२७’चे भाजपचे युवा नेते तथा उद्योजक विशाल परब यांच्या प्रमुख उपस्थितीत शानदार प्रकाशन करण्यात आले.

या सोहळ्यात उपस्थितांशी संवाद साधताना युवा नेते विशाल परब यांनी कास ग्राम विकास संस्थेच्या कार्याचे विशेष कौतुक केले. गावापासून दूर राहूनही आपल्या जन्मभूमीशी असलेली नाळ जपणे, गावातील माणसांना एकत्र आणणे आणि गावाच्या सर्वांगीण विकासासाठी संघटितपणे प्रयत्न करणे, ही निश्चितच कौतुकास्पद बाब असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

अशा संस्था गावाच्या सामाजिक आणि विकासात्मक वाटचालीत महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात, असे गौरवोद्गारही त्यांनी काढले. श्री देवी माऊलीच्या आशीर्वादाने आयोजित करण्यात आलेल्या या स्नेहमेळाव्यात गावप्रेम, आपुलकी आणि एकजुटीचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला.

मुंबईच्या धावपळीच्या जीवनात स्थिरावलेली, मात्र मनाने आपल्या गावाशी घट्ट जोडलेली माणसे या निमित्ताने एकत्र आली. जुन्या आठवणींना उजाळा मिळाला, स्नेहबंध अधिक दृढ झाले आणि गावाच्या विकासासाठी नव्या संकल्पनांची देवाणघेवाण झाली.

यावेळी कास गावचे सरपंच प्रविण अशोक पंडित आणि जिल्हा परिषद सदस्य नितीन राऊळ यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी, सदस्य आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. संस्थेच्या माध्यमातून गावाच्या विकासासाठी सुरू असलेल्या विविध उपक्रमांचे आणि सामाजिक एकजुटीच्या प्रयत्नांचे यावेळी विशेष कौतुक करण्यात आले. KGVS दिनदर्शिका २०२७’चे प्रकाशन हा या सोहळ्याचा विशेष आकर्षणाचा क्षण ठरला.

केवळ तारखांची नोंद करणारी दिनदर्शिका नव्हे, तर गावाशी असलेले नाते, संस्थेची वाटचाल आणि सामूहिक विकासाच्या संकल्पनांना जोडणारा एक भावनिक दुवा म्हणून या उपक्रमाकडे पाहिले जात आहे. गावाच्या मातीशी निष्ठा, माणसांशी आत्मीयता आणि विकासासाठी सामूहिक प्रयत्नांची प्रेरणा देणारा कास ग्राम विकास संस्थेचा हा स्नेहमेळावा अविस्मरणीय ठरला. विशाल परब यांनी केलेल्या कौतुकाच्या शब्दांनी संस्थेच्या पदाधिकारी व सदस्यांना निश्चितच नवी ऊर्जा आणि प्रेरणा मिळाली.