
पणजी : शंभराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची नांदी गोव्यातही घुमणार असून, येत्या १४ नोव्हेंबर रोजी बांबोळी येथील धेंपो महाविद्यालयात नांदी संमेलन आयोजित करण्यात येणार आहे. मराठी साहित्याचा जागर, गोव्यातील साहित्यिकांशी संवाद आणि त्यांना राष्ट्रीय स्तरावरील साहित्य चळवळीशी जोडण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
त्यानंतर १५ नोव्हेंबर रोजी बेळगाव येथे नांदी संमेलन होणार आहे. या संमेलनांच्या माध्यमातून मराठी भाषिक प्रदेशांतील साहित्यिकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न असल्याची माहिती अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष योगेश सोमण यांनी गुरुवारी पणजी येथे आयोजित स्नेहमेळाव्यात दिली.
यावेळी मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष व तरुण भारतचे समूह संपादक डॉ किरण ठाकूर व गोमंतक साहित्य सेवक मंडळाचे अध्यक्ष रमेश वंसकर उपस्थित होते. तसेच गोव्यातील विविध वृत्तपत्रांचे संपादक आणि माध्यम प्रतिनिधी उपस्थित होते.
जानेवारी २०२७ मध्ये पुणे येथील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रांगणात २८ ते ३१ जानेवारीदरम्यान शंभरावे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार आहे. या ऐतिहासिक संमेलनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात ९९ नांदी संमेलने आयोजित करण्याची संकल्पना आहे. केवळ मुख्य संमेलनाचे निमंत्रण देणे हा यामागील उद्देश नसून, विविध भागांतील साहित्यिक, कवी, लेखक, शिक्षक, ग्रंथपाल, पत्रकार आणि मराठी भाषेच्या संवर्धनासाठी काम करणाऱ्या व्यक्तींशी प्रत्यक्ष संवाद साधून त्यांना या साहित्य चळवळीशी जोडण्यावर भर दिला जात आहे.
मराठी साहित्य संमेलनांची परंपरा केवळ साहित्यिकांच्या भेटीगाठींपुरती मर्यादित नाही. मराठी भाषेचे प्रश्न, तिचे संवर्धन, साहित्यिक परंपरेचे जतन आणि भाषेच्या भवितव्याविषयी विचारमंथन करण्याचे महत्त्वाचे व्यासपीठ म्हणून या संमेलनांकडे पाहिले जाते. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीपासून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्याच्या प्रयत्नांपर्यंत अनेक महत्त्वाच्या विषयांवर या परंपरेत विचार मांडले गेले आहेत.
नांदी संमेलनांच्या माध्यमातून स्थानिक साहित्यिकांना आपले विचार मांडण्याची संधी मिळणार आहे. गोव्यातील कवी, कथाकार, लेखक आणि साहित्य क्षेत्रात कार्यरत असलेल्या व्यक्तींना या उपक्रमात सहभागी करून घेतले जाणार आहे.
त्याचबरोबर आगामी शंभराव्या साहित्य संमेलनातील परिसंवाद, चर्चासत्रे आणि अन्य साहित्यिक कार्यक्रमांमध्ये गोव्यातील साहित्यिकांचा सहभाग वाढवण्याचा प्रयत्न राहणार आहे. साहित्य क्षेत्रातील सर्वांना समान संधी देण्यावर भर दिला जाणार असल्याचेही यावेळी सोमण यांनी सांगितले. मराठी भाषेच्या संवर्धनासाठी साहित्य संस्था, शासन आणि समाज यांनी एकत्रितपणे काम करण्याची गरज यावेळी अधोरेखित करण्यात आली.
भाषा संवर्धनासाठी एकत्रित प्रयत्नांची गरज : डॉ. किरण ठाकूर
गोव्यात मराठी भाषेच्या विकासासाठी आवश्यक सहकार्य आणि निधी उपलब्ध व्हावा, तसेच मराठी भाषेसाठी कार्यरत असलेल्या संस्थांना बळ मिळावे, अशी अपेक्षा आहे. महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमामुळे साहित्यिकांपर्यंत थेट पोहोचून त्यांना साहित्य चळवळीशी जोडण्याचा प्रयत्न होत आहे. विविध शहरांतील साहित्यिकांचे विचार जाणून घेणे, त्यांच्या कार्याची दखल घेणे आणि त्यांना मुख्य संमेलनात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करणे, हा नांदी संमेलनांचा महत्त्वाचा भाग आहे. महाराष्ट्राबाहेरील मराठी भाषिक केंद्रांमध्येही हा उपक्रम राबविण्यात येत असून, मराठी साहित्याचा विस्तार अधिक व्यापक करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
१०१ वे साहित्य संमेलन गोव्यात व्हावे : रमेश वंसकर
गोव्यात मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्याची परंपरा पुढे सुरू राहावी, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली. शंभराव्या संमेलनानंतर होणारे १०१ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन गोव्यात आयोजित करण्याबाबत साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांशी चर्चा करण्यात आली असून, त्यासाठी सकारात्मक प्रयत्न करावे असे रमेश वंसकर यांनी सांगितले. गोव्यातील साहित्यिकांना राष्ट्रीय स्तरावर अधिक संधी मिळावी आणि गोव्याच्या साहित्यिक योगदानाची व्यापक दखल घेतली जावी, हा यामागील हेतू आहे.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all








