
पणजी : नावेली-साखळी येथे रस्ते अपघातात गंभीर जखमी होऊन रस्त्यावर पडलेल्या एका युवकाच्या मदतीसाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी धाव घेतली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी जखमी युवकावर प्राथमिक उपचार केले. अपघात घडला त्यावेळी मुख्यमंत्र्यांचा वाहनांचा ताफा त्याच मार्गावरून जात होता.
रस्त्यावर पडलेल्या युवकाला पाहताच मुख्यमंत्र्यांनी क्षणाचाही विलंब न करता आपला ताफा थांबवला आणि जखमी युवकाला प्रथमोपचार देत त्याला रुग्णालयात दाखल करण्यासाठी आवश्यक सहकार्य केले.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी यापूर्वीही अशा प्रकारे अपघातग्रस्तांना मदतीचा हात दिला आहे. राज्यभर दौऱ्यावर असताना रस्त्यावर अपघात झाल्याचे निदर्शनास आल्यास ते आपला वाहनांचा ताफा थांबवून जखमींच्या मदतीसाठी पुढाकार घेतात. अनेक प्रसंगी त्यांनी जखमींना प्रथमोपचार देण्याबरोबरच आपल्या ताफ्यातील वाहन उपलब्ध करून त्यांना तातडीने रुग्णालयात पोहोचविण्यासाठी सहकार्य केले आहे.
काही महिन्यांपूर्वी काणकोण येथील अपघातावेळीही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आपल्या वाहनांचा ताफा थांबवून अपघातग्रस्तांना मदत केलेली होती. त्यानंतर न्हावेली येथील घटनेवेळीही त्यांनी ताफा थांबवून अपघातग्रस्तांना मदत केल्याने त्यांच्यातील डॉक्टर आवश्यक तेथे धावून जाणारच हे दिसून आले.
अपघातानंतर जखमींना वेळेत वैद्यकीय मदत मिळणे अत्यंत महत्त्वाचे असते. अशा वेळी मुख्यमंत्र्यांनी स्वतः पुढाकार घेतल्याने मदतकार्याला गती मिळण्यास हातभार लागतो. नावेली-साखळी येथील घटनेतही त्यांनी तातडीने मदत केल्याने उपस्थितांचे लक्ष वेधले. मुख्यमंत्र्यांच्या या कृतीचे नागरिकांकडून कौतुक केले जात आहे.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all








