
नवी दिल्ली : पाकिस्तानी हेराकडे सागरी गुप्तचर माहिती पुरवल्याच्या आरोपावरून भारतीय नौदलाच्या एका खलाशाला अटक करण्यात आली आहे. याबाबतची माहिती अधिकाऱ्यांनी रविवारी दिली.
अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सोशल मीडियावर 'हनी-ट्रॅप'च्या माध्यमातून भारतविरोधी घटकांनी या खलाशाला जाळ्यात ओढले होते. आंध्र प्रदेश पोलिसांच्या 'काउंटर इंटेलिजन्स' विभागाने ३ ऑक्टोबर रोजी कोईम्बतूरमधील नौदलाच्या 'आयएनएस अग्रणी' (INS Agrani) या नेतृत्व प्रशिक्षण केंद्रातून ३१ वर्षीय संशयित प्रदीप मुखर्जी याला अटक केली.
पश्चिम बंगालचा रहिवासी असलेला संशयित मुखर्जी २०१४ मध्ये खलाशी म्हणून नौदलात भरती झाला होता आणि त्याची नियुक्ती विशाखापट्टणम येथील 'ईस्टर्न नेव्हल कमांड'मध्ये होती. अटकेच्या वेळी तो व्यवस्थापन विकास अभ्यासक्रमासाठी उपस्थित होता आणि गेल्या आठभरापासून कोईम्बतूर येथील प्रशिक्षण केंद्रात राहत होता.
मिळालेल्या माहितीनुसार, काही महिन्यांपूर्वी एका पाकिस्तानी महिला हेराने सोशल मीडियाद्वारे संशयित मुखर्जी यांच्याशी संपर्क साधला होता. कालांतराने, या ऑनलाइन ओळखीचा फायदा घेत तिने विशाखापट्टणम नौदल तळाशी संबंधित धोरणात्मक नौदल मालमत्ता, नौदलाच्या ताफ्यांची हालचाल आणि मोहिमेसंबंधीच्या संवेदनशील तपशीलांची माहिती त्याच्याकडून मिळवली.
सीमापार हेरगिरी आणि दहशतवादी कारवायांच्या धोक्यांचा सामना करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या विशेष विभागाकडून (CI Cell) या खलाशाच्या संशयास्पद डिजिटल हालचालींची दखल घेत तपास सुरू करण्यात आला होता आणि त्यानंतर त्याच्यावर पाळत ठेवण्यात आली होती.
ताजी बातमी
View all














