
मुंबई : आयपीओ मार्केटसाठी सप्टेंबर महिना अत्यंत व्यस्त ठरला. या काळात अनेक मोठ्या कंपन्यांचे आयपीओ आले आणि त्यांची शेअर मार्केटमध्ये नोंदणी झाली. मात्र, ऑक्टोबरचा पहिला आठवडा तुलनेने शांत राहण्याची शक्यता आहे. या काळात गुंतवणुकीसाठी केवळ एकच नवीन आयपीओ खुला होत आहे, तर सुमारे २९ कंपन्या शेअर मार्केटमध्ये पदार्पण करण्याच्या तयारीत आहेत.
आरके फॅशन ॲक्सेसरीज आयपीओ (RK Fashion Accessories)
पुढील आठवड्यात गुंतवणुकीसाठी खुला होणारा एकमेव आयपीओ 'आरके फॅशन ॲक्सेसरीज'चा आहे. हा 'एनएसई, एसएमई' (NSE SME) आयपीओ आहे. या ऑफरद्वारे कंपनी ४२.६७ लाख नवीन शेअर्स जारी करून ३५ कोटी रुपये उभारण्याची योजना आखत आहे.
गुंतवणूकदार ५ ऑक्टोबर ते ७ ऑक्टोबर या कालावधीत या आयपीओसाठी बोली लावू शकतील. यासाठी प्रति शेअर ७७ ते ८२ रुपये अशी किंमत श्रेणी (price band) निश्चित करण्यात आली असून, लॉट साईझ १,६०० शेअर्सची आहे. किरकोळ गुंतवणूकदारांसाठी, किंमत श्रेणीच्या उच्च मर्यादेनुसार किमान गुंतवणूक २.६२ लाख रुपये असेल.
विशेष म्हणजे, कोलकातास्थित ही कंपनी आहे. कंपनी कंत्राटी उत्पादकांद्वारे (contract manufacturers) 'इमिटेशन ज्वेलरी'चे उत्पादन आणि विक्री करते. तसेच ब्रँडेड सौंदर्यप्रसाधनांचा (cosmetics) व्यापारही करते. कंपनी घाऊक, किरकोळ आणि ऑनलाइन अशा विविध माध्यमांतून आपला व्यवसाय चालवते.
आयपीओमधून मिळणाऱ्या निधीचा वापर कंपनी खेळते भांडवल, बारुईपूर येथील नवीन प्लेटिंग सुविधा, कोलकातामधील बी२बी (B2B) शोरूम, बी२सी (B2C) स्टोअर्सचे काम पूर्ण करणे आणि नवीन आउटलेट्ससाठी इन्व्हेंटरी (मालसाठा) उभारणे यांसाठी करणार आहे.
चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत (एप्रिल ते सप्टेंबर) विविध कंपन्यांनी आयपीओद्वारे विक्रमी ९४,२०५ कोटी रुपये उभारले. एका अहवालानुसार, या सहा महिन्यांच्या कालावधीत एकूण ७८ कंपन्यांनी 'मेनबोर्ड' आयपीओ आणले आणि त्याद्वारे ९४,२०५ कोटी रुपये उभे केले. हा आकडा गेल्या वर्षी याच कालावधीत ६५ आयपीओद्वारे उभारलेल्या ६९,५३३ कोटी रुपयांच्या तुलनेत ३५ टक्क्यांनी अधिक आहे.
अहवालानुसार, 'सेबी'ची (SEBI) मंजुरी मिळालेल्या एकूण १४५ कंपन्या सुमारे २.७८ लाख कोटी रुपये उभारण्याच्या तयारीत आहेत, तर आणखी १०२ कंपन्या बाजार नियामक प्राधिकरणाच्या मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत. या कंपन्या आयपीओ (IPO) द्वारे १.८७ लाख कोटी रुपयांपर्यंतचा निधी उभारू शकतात.
(डिस्क्लेमर : माहिती शेअर करण्याच्या उद्देशाने हा लेख देण्यात आला आहे. गुंतवणुकीचा सल्ला या लेखात देण्यात आलेला नाही. शेअर बाजारात गुंतवणूक करताना जोखीम असते. त्यामुळे स्वतःच्या जोखमीवर शेअर बाजारात गुंतवणुक करा. गुंतवणूक करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)














