LIVE UPDATES

हिंदळेत जलसंधारणासाठी ‘एकजुटीचे श्रमदान’

जि. प. सदस्य सुनील पारकर यांच्यासह ग्रामोन्नती मंडळ व विश्वेश्वर मांड मंडळाचा पुढाकार
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: October 05, 2026 12:26 PM
views 39  views

देवगड : ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ या संकल्पनेतून देवगड तालुक्यातील हिंदळे भंडारवाडा येथे जलसंधारणाच्या कामाला ग्रामस्थांनी श्रमदानाची जोड दिली. श्री काशी विश्वेश्वर मंदिर परिसरात हिंदळे ग्रामोन्नती मंडळ आणि विश्वेश्वर मांड मंडळाच्या पुढाकाराने कच्चा बंधारा बांधण्यात आला. हिंदळे गावचे जिल्हा परिषद सदस्य सुनील पारकर यांनी ग्रामस्थांसमवेत प्रत्यक्ष श्रमदान करून या उपक्रमात सहभाग घेतला.

पावसाचे पाणी वाहून जाण्याऐवजी ते अडवून जमिनीत मुरावे, तसेच परिसरातील भूजल पातळी वाढण्यास मदत व्हावी, या उद्देशाने बंधारा बांधण्यात आला. दोन मंडळांचे पदाधिकारी, ग्रामस्थ, ग्रामपंचायत, कृषी विभागातील अधिकारी, शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी एकत्र येत श्रमदान केले. सामूहिक सहभागातून बंधाऱ्याचे काम पूर्ण करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य सुनील पारकर, सरपंच मकरंद शिंदे, ग्रामपंचायत सदस्या दिप्ती खोत, अंगणवाडी कर्मचारी वैशाली तेली व प्रज्ञा हिंदळेकर उपस्थित होते.

हिंदळे ग्रामोन्नती मंडळाचे समील हळदणकर, राहुल पारकर, बाळा वानिवडेकर, दिनार वळंजू, बबन हळदणकर, परेश खोत, योगेश पाटील, आदित्य आचरेकर, जीजी खोत, कुरकुंदे, सचिन हळदणकर, मंगेश हिर्लेकर, दिनेश पारकर आणि संजय हळदणकर यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. याशिवाय ग्रामपंचायत अधिकारी, कृषी अधिकारी तसेच भंडारवाडा येथील शिक्षक धर्मराज धुरत, बांदल, मयेकर मॅडम आणि शाळेतील विद्यार्थ्यांनीही श्रमदान मोहिमेत सहभाग घेतला.