
नवी दिल्ली : भारताच्या यापूर्वीच्या हांगझोऊ स्पर्धेतील विक्रमी कामगिरीनंतर आयची-नागोया आशियाई क्रीडा स्पर्धेत आणखी एका मोठ्या प्रगतीची अपेक्षा होती, परंतु प्रत्यक्षात पदकांच्या संख्येत मोठी घट झाली.
एकूण पदक तालिकेत भारताने चौथे स्थान कायम राखले असले तरी, त्यांची एकूण कमाई ८५ पदकांपुरतीच मर्यादित राहिली. यात २१ सुवर्ण, २७ रौप्य आणि ३७ कांस्य पदकांचा समावेश होता. मागील आशियाई क्रीडा स्पर्धेत मिळवलेल्या १०६ पदकांच्या तुलनेत एकूण २१ पदके आणि ७ सुवर्ण पदकांची कमी होती.
चीनने १६९ सुवर्णपदकांसह एकूण ३४१ पदके जिंकून अव्वल स्थानावरील आपले वर्चस्व कायम राखले. जपान ८३ सुवर्ण आणि एकूण २६९ पदकांसह दुसऱ्या स्थानावर राहिला, तर दक्षिण कोरियाने ३९ सुवर्ण आणि १५० पदकांसह तिसरे स्थान पटकावले.
भारताचे चौथे स्थान पटकावले. ही कामगिरी महत्त्वपूर्ण असली तरी, भारत आणि अव्वल दर्जाचे देश यांच्यात अजूनही मोठी दरी आहे. जर भारताने शेवटच्या दोन दिवसांत ११ सुवर्णपदकांची नेत्रदीपक कमाई केली नसती, तर अव्वल पाचमध्ये स्थान मिळवणेही कठीण झाले असते.
नेमबाजी आणि ॲथलेटिक्समधील निराशाजनक कामगिरी
भारताच्या पदक मोहिमेतील या कमतरतेचे एक मुख्य कारण म्हणजे नेमबाजी आणि ॲथलेटिक्स या पारंपरिकदृष्ट्या मजबूत असलेल्या क्रीडा प्रकारांमध्ये पदकांच्या संख्येत घट झाली. दोन्ही खेळांकडून मोठ्या अपेक्षा होत्या, तरीही हांगझोऊ स्पर्धेच्या तुलनेत भारतातर्फे यात कमी पदके जिंकली गेली.
नेमबाजीतील भारताच्या कामगिरीत लक्षणीय घट दिसून आली. ३० सदस्यांच्या भारतीय संघाने ज्याने यापूर्वी सात सुवर्ण, नऊ रौप्य आणि सहा कांस्य अशा एकूण २२ पदकांची कमाई केली होती. यावेळी जपानमधून तीन सुवर्ण, आठ रौप्य आणि चार कांस्य अशा १५ पदकांसह परतीचा प्रवास केला.
हॉकीमध्ये, भारतीय महिला संघाने आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून ४४ वर्षांची प्रतीक्षा संपवली. अंतिम सामन्यात त्यांनी गतविजेत्या चीनचा १-० असा पराभव केला. लालरेम्सियामीने निर्णायक गोल केला, तर गोलकीपर बिचू देवीने उत्कृष्ट कामगिरी केली आणि अनुभवी सविता पुनियाने संपूर्ण स्पर्धेत महत्त्वाची भूमिका बजावली. तसेच २०२८ च्या लॉस एंजेलिस ऑलिम्पिकसाठी थेट पात्रताही मिळवली आहे.
पुरुष संघानेही त्यांचे आशियाई क्रीडा स्पर्धेतील विजेतेपद कायम राखले आणि लॉस एंजेलिसचे तिकीट निश्चित केले. उपांत्य फेरीत पाकिस्तानवर ४-३ असा रोमांचक विजय मिळवल्यानंतर, भारतीय पुरुष संघाने अंतिम सामन्यात मलेशियाचा पराभव केला.
क्रिकेट संघांचीही सुवर्ण कामगिरी
क्रिकेटने भारताच्या मोहिमेचा शानदार समारोप केला. पुरुष गटाच्या अंतिम सामन्यात कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा १९ धावांनी पराभव करून भारताने सुवर्णपदक कायम राखले. श्रेयस अय्यरच्या संघाने अत्यंत तणावपूर्ण सामन्यातही आपला संयम राखला. याआधी, भारतीय महिला संघानेही सुवर्णपदक जिंकले होते. अशा प्रकारे, भारताने क्रिकेटमधील दोन्ही प्रकारांत आपली विजेतेपदे यशस्वीपणे राखली.














