
रत्नागिरी : जिल्ह्यात यंदा २० टक्के कमी पाऊस पडल्यामुळे, त्याचा परिणाम धरणातील पाणीसाठ्यावर झाला आहे. गतवर्षीच्या तुलनेत ६ टक्के यंदा पाणीसाठी कमी आहे. पाटबंधारे मंडळाच्या अहवालानुसार, जिल्ह्यातील लघू आणि मध्यम पाटबंधारे प्रकल्पांमध्ये सध्या ३७०.९६ दशलक्ष घनमीटर (दलघमी) म्हणजेच ७८.७६ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. गतवर्षी आजच्या तारखेला धरणांमध्ये ३८३.३२ दलघमी म्हणजेच ८४.८५ टक्के साठा होता.
विदर्भ आणि मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये धरणांमधील पाणीसाठा ५ ते १० टक्क्यांपर्यंत खाली आल्यामुळे तेथे पिण्याच्या व सिंचनाच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. त्या तुलनेत कोकणातील स्थिती अधिक स्थिर आहे. कोकणात सिंचनासाठी मोठ्या प्रमाणावर पाणी सोडण्याची गरज भासत नसल्याने धरणांवर अतिरिक्त ताण येत नाही. धरणातील उपलब्ध पाणी विहिरी आणि स्थानिक स्त्रोतांमध्ये सोडून पिण्याच्या पाण्याच्या पुरवठ्यासाठी बळ दिले जाते.
'ऑक्टोबर हिट'च्या प्रभावामुळे बाष्पीभवनाचा वेग वाढू शकतो. पण प्रकल्प नियोजनात आधीच ३ टक्के बाष्पीभवन गृहीत धरले आहे. जिल्ह्यातील धरणांमध्ये एकूण उपयुक्त पाणीसाठा जवळपास ७९ टक्के आहे. प्रशासनाला आतापासूनच नियोजन करावे लागणार आहे. सद्यःस्थिती पाहता भविष्यातील टंचाई टाळण्यासाठी आणि नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करणे आवश्यक असल्याचे प्रशासनाकडून आवाहन केले जात आहे.
जिल्ह्यातील प्रकल्पांमधील पाणीसाठा (दलघमीमध्ये)
१०० टक्के भरलेली धरणे : शीळ धरण, अर्जुना मध्यम प्रकल्प, मुचकुंदी धरण, ओझर, बारेवाडी, मोर्डे, गुहागर धरण, शिरवली, शेलडी, तळवट, कुरवळ, शिवतर, चिंचाळी, तुळशी, तिडे, शिरसाडी, सोंडेघर, सुकोंडी, पंचनदी, रेवली.
९० ते ९९ टक्के भरलेली : नातुवाडी मध्यम प्रकल्प, चिंचवाडी, दिवाळवाडी, रांगव, शिपोशी, व्हेळ, गवाणे, झापडे, बेणी, हर्दखळे, फणसवाडी, मालघर, अडरे, मोरवणे, आंबतखोल,
८० ते ९० टक्के भरलेली : गडनदी प्रकल्प
८० टक्केपेक्षा खाली असलेली : शेलारवाडी, साखरपा, पिंपळवाडी,
६० टक्के पर्यंत भरलेली : निवे, कशेळी, परूळे, तेलेवाडी
५० टक्केपेक्षा खाली असलेली : गडगडी, भोळवली, बेर्डेवाडी, पन्हळे, कळवंडे, येलोंदवाडी, तळवडे











