
नवी दिल्ली : बिहारमधील पूर्व चंपारण जिल्ह्यात एक दुर्दैवी घटना घडली असून यात एका तलावात बुडून आठ मुलींपैकी चौघींचा मृत्यू झाला आहे. पहारपूर भागातील एका तलावात आंघोळ करत असताना या मुली बुडाल्याचे समजते. ही घटना शुक्रवारी सकाळी १० च्या सुमारास पहारपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील इनरवाभर पंचायतींतर्गत येणाऱ्या बांकाट गावात घडली. मृतांपैकी दोघी बहिणी होत्या.
मिळालेल्या माहितीनुसार, आठ मुली आणि एक मुलगा यांचा गट तलावात आंघोळ करत होता. त्यावेळी त्यातील चार मुली खोल पाण्यात गेल्या आणि बुडाल्या. त्यानंतर इतर मुले पाण्याबाहेर आली आणि त्यांनी आपल्या कुटुंबीयांना याची माहिती दिली. त्यानंतर ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मृतदेह बाहेर काढले.
मृतांमध्ये प्रमोद महतो यांच्या मुली सोनामती कुमारी (वय १३) आणि फुलमती कुमारी (वय ११) तसेच अच्छेलाल पासवान यांची मुलगी प्रतिमा कुमारी (वय ७) आणि वीरेंद्र महतो यांची मुलगी कृती कुमारी (वय ११) यांचा समावेश आहे. सोनामती इयत्ता सहावीत, फुलमती चौथीमध्ये, कृती पाचवीमध्ये आणि प्रतिमा पहिलीमध्ये शिकत होत्या.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले. या दुर्दैवी अपघाताची माहिती पोलिसांना देण्यात आली आणि अरेराजचे डीएसपी पंकज कुमार मिश्रा यांनी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी घटनास्थळी भेट दिली.
दरम्यान, पीडित मुलींचे कुटुंबीय प्रचंड दुःखात बुडाले असून त्यांना अश्रू अनावर झाले आहेत, तर संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all










