LIVE UPDATES

Ratnagiri drought 2026 : ५,५०० शेतकऱ्यांच्या १,८०० हेक्टरवरील पंचनामे पूर्ण

Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: October 05, 2026 13:56 PM
views 37  views

रत्नागिरी : आतापर्यंत जिल्ह्यातील ५ हजार ५०० शेतकऱ्यांचे १८०० हेक्टरवरील पंचनामे पूर्ण झालेले आहेत. ही आकडेवारी चिंताजनक असून यावर्षी भात विक्री करुन त्यामधून उत्पन्न मिळवणाऱ्या ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचा खिसा रिकामा राहणार आहे. 

या वर्षी जिल्ह्यात पावसाने ओढ दिली व आता ऑक्टोबर हिटचाही तडाखा जाणवू लागला आहे. सप्टेंबर महिन्यात पाऊसच झाला नसल्याने यावर्षी तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार असून पावसाअभावी उशिराने होणारे भातपीक हाती येण्याची शक्यता नाही.

धरणांमधील पाणीसाठ्यातही तुलनेत तूट आहे. या परिस्थितीनुसार तीन तालुके राज्याच्या दुष्काळग्रस्त यादीत समाविष्ट झाले आहेत. उर्वरित सहा तालुक्यांमध्येही कमी-अधिक प्रमाणात भातशेती आणि टंचाईची स्थिती गंभीर आहे. याच परिस्थितीचा आढावा यानिमित्ताने घेण्यात आला आहे.

जिल्ह्यात २० टक्के कमी पाऊस पडल्यामुळे जिल्ह्यातील ३ मध्यम व ६९ छोट्या धरणांमध्ये ७९ टक्के पाणीसाठी उपलब्ध आहे. कमी पावसामुळे भात शेतीचे होणाऱ्या नुकसानीचे पंचनामे करण्यास कृषी विभागाकडून प्रारंभ झाला आहे. चिपळूण आणि गुहागर तालुक्यांत ओलाव्याच्या अभावामुळे जमिनीला भेगा पडल्या असून पिकांवर करपा रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे.

संगमेश्वर तालुक्यात सरासरीच्या तुलनेत अवघा १४७८.७ मिमी कमी पाऊस झाला आहे. यामुळे शेतीसोबतच ग्रामीण भागातील विहिरी व ओढ्यांच्या पाणीसाठ्यात घट झाली आहे. त्याचा परिणाम भविष्यात काही दिवसात पहायला मिळणार आहे. मार्च महिन्याच्या अखेरीस धावणारे टँकर यंदा एक महिना आधीच धावण्याची शक्यता आहे.

खेड, चिपळूण या तालुक्यातील ग्रामीण भागात पाण्याची गंभीर स्थिती उद्भवू शकते. तसेच गतवर्षी वाशिष्ठी नदीपात्रात पाणीच नसल्याने लोटे औद्योगिक वसाहतीत पाणीच नव्हते. तीच परिस्थिती यंदा पुन्हा उद्भवण्याची भिती आहे. त्यादृष्टीने प्रशासनाला आतापासूनच नियोजन करावे लागणार आहे. त्यासाठी जिल्ह्यातील धरणांमधील पाणी गावांपर्यंत पोहोचवण्याची वितरण यंत्रणा सक्षम नसल्याने 'धरण उशाशी आणि ग्रामस्थ तहानलेले' अशी परिस्थिती टाळण्यासाठीचे आव्हान आहे.