LIVE UPDATES

Best keypad feature phones : 1 हजार रुपयांच्या कमी बजेटमध्ये खरेदी करा हे 5 बेस्ट फीचर फोन

best keypad phones under 1,000 : कॉलिंग फिचरसोबत एफएम रेडिओ, फ्लॅशलाइट आणि यूपीआयच्या सपोर्टसारखे फिचर्स असलेले मोबाईल फोन 1 हजार रुपयांच्या बजेटमध्ये तुम्ही खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे.
Edited by: Rajat Sawant
Published on: August 25, 2026 14:17 PM
views 108  views
Best budget keypad phones 2026

मुंबई : स्मार्टफोनच्या काळात आजही अनेक लोक बटनांचे फोन वापरणे पसंत करतात. या फोनवरुन कॉल करणे तसेच वारंवार चार्जिंग करण्याची गरज भासत नाही. कॉलिंग फिचरसोबत एफएम रेडिओ, फ्लॅशलाइट आणि यूपीआयच्या सपोर्टसारखे फिचर्स असलेले मोबाईल फोन 1 हजार रुपयांच्या बजेटमध्ये तुम्ही खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. चला तर जाणून घेऊया त्यांच्या किमती आणि फिचर्सबद्दल.

नोकीया 105 क्लासिक (Nokia 105 Classic)

नोकीयाचा 105 क्लासिक फोन तुम्ही ९९९ रुपयांच्या किंमतीत खरेदी करु शकता. हा फोन एस 30 प्लस प्लॅटफॉर्मवर चालतो आणि यात यूनिसॉक 6531ई प्रोसेसर देण्यात आला आहे. या फोनमध्ये १.७७ इंचाचा क्यूक्यूव्हीजीए डिस्प्ले आणि ८०० एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. एकदा पूर्ण चार्ज केल्यावर हा फोन १८ दिवसांपर्यंतचा 'स्टँडबाय टाइम' देतो. याच्या मुख्य फिचर्समध्ये ड्युअल सिम सपोर्ट, वायरलेस एफएम रेडिओ, ३.५ मिमी हेडफोन जॅक आणि फ्लॅशलाइट यांचा समावेश आहे.

एचएमडी 100 (HMD 100)

जर तुम्ही केवळ कॉलिंग आणि इतर काही ठराविक वापराकरीता फोनचा वापर करणार असाल तर एचएमडी 100 हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. ९९९ रुपये किमतीचा हा फीचर फोन १.७७ इंचाची स्क्रीन आणि ८०० एमएएच बॅटरीसह येतो. यात ड्युअल सिम, एफएम रेडिओ, ३.५ मिमी हेडफोन जॅक आणि फ्लॅशलाइट यांसारखे आवश्यक फिचर्सही आहेत. फाइल्स आणि इतर डेटा साठवण्यासाठी या फोनमध्ये ४ एमबी रॅम आणि ४ एमबी अंतर्गत स्टोरेज देण्यात आली आहे.

लावा हिरो शक्ती 2026 (Lava Hero Shakti 2026)

लावा हिरो शक्ती 2026 हा फोन १ हजार रुपयांपेक्षा कमी किमती खरेदी करण्यासाठी आणखी एक चांगला पर्याय आहे. याची किंमत ९८८ रुपये आहे. यात १.८ इंचाचा कलर डिस्प्ले आहे. ज्याचे रिझोल्यूशन १६०×१२८ पिक्सल आहे. या फोनमध्ये ४ एमबी रॅम आणि ३२ जीबी अंतर्गत स्टोरेजची देण्यात आली आहे. या फोनमध्ये १००० एमएच बॅटरी पॅक देण्यात आला आहे आणि हा फोन ड्युअल सिमला सपोर्ट करतो. यात एफएम रेडिओ, फ्लॅशलाइटही देण्यात आली आहे. तसेच, या फोनची बॉडी अतिशय मजबूत आहे. 

आयटेल एसीई 3 हिरा (itel Ace 3 Heera)

तुम्ही ९४९ रुपयांमध्ये फीचर फोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आयटेल एसीई 3 हिरा या फोनचा पर्याय उत्तम आहे. यात १.८ इंचाची स्क्रीन आणि त्याखाली टी 9 कीपॅड देण्यात आले आहे. या कीपॅडवर फ्लॅशलाइट, व्हायब्रेशन आणि व्हॉइस कमांड्ससाठी खास शॉर्टकट बटणे आहेत. या फोनमध्ये १००० एमएएचची बॅटरी असून चार्जिंगसाठी यूएसबी टाईप सी पोर्टचा वापर केला जातो. याचे एक खास फिचर म्हणजे किंग टॉल्कर व्हॉइस असिस्टंट, जो हिंदी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषांना सपोर्ट करतो. यात वायरलेस एफएम रेडिओची सुविधा आहे. तसेच ब्लूटूथ आणि ऑटो कॉल रेकॉर्डिंगसारखी फिचर्सही यात मिळतात.

जिओ भारत व्ही 4 (Jio Bharat V4)

जर तुम्ही इंटरनेटचा वापर आणि यूपीआय पेमेंटला सपोर्ट करणाऱ्या बजेटमधील 4 जी फीचर फोनच्या शोधात असाल तर जिओ भारत व्ही 4 हा एक उत्तम पर्याय आहे. हा फोन जिओ यूपीआयला सपोर्ट करतो. यात जिओ सिनेमा, जिओ चॅट आणि जिओ टीव्ही यांसारख्या विविध जिओ ॲप्सचा ॲक्सेस मिळतो. त्यामुळे तुम्ही या कॉम्पॅक्ट कीपॅड फोनवरच टीव्ही आणि चित्रपट पाहू शकता तसेच चॅटिंग आणि व्हॉइस मेसेज पाठवू शकता. ८९९ रुपयांच्या किमतीच्या या फोनमध्ये १००० एमएएचची बॅटरी आहे. यात १२८ जीबी पर्यंत मेमरी कार्ड वाढवण्याची सुविधा आहे. विशेष म्हणजे, हा फोन २३ भारतीय भाषांना सपोर्ट करतो.