
कुडाळ : तालुक्यातील पिंगुळी येथे एका तलावात मगर शिरल्याची घटना समोर आली असून, वनविभागाच्या द्रुत कृती दलाने (RRT) आणि कर्मचाऱ्यांनी तब्बल दोन दिवस चाललेल्या अत्यंत कठीण आणि जोखमीच्या मोहिमेनंतर मगरीला सुखरूप जेरबंद केले. मगरीची प्रकृती उत्तम असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर तिला तिच्या नैसर्गिक अधिवासात सुरक्षितपणे सोडण्यात आले आहे.
बचाव कार्यापुढील आव्हाने आणि थरारक मोहीम
२४ व २५ ऑगस्ट रोजी पिंगुळी येथील तलावात मगर पडल्याची माहिती ग्रामस्थांनी तात्काळ वनविभागाला दिली. यानंतर वनविभागाची आरआरटी टीम आणि स्टाफने तातडीने घटनास्थळी धाव घेत बचाव कार्य सुरू केले. मात्र, तलाव अत्यंत खोल असल्याने आणि पाण्याचा साठा जास्त असल्यामुळे मगर पकडणे मोठे आव्हानात्मक ठरत होते.
परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत मड पंपच्या साहाय्याने तलावातील पाणी कमी करण्यात आले. असे असले तरी, एका बाजूने पाण्याचा सतत सुरू असलेला प्रवाह आणि तलावात साचलेला बराच गाळ यामुळे बचाव कार्यात वारंवार अडथळे निर्माण होत होते. तरीही, न खचता दोन दिवसांतील जवळपास ५ ते ६ तासांच्या कल्पक व धाडसी प्रयत्नांनंतर वनक्षेत्रपाल कार्यालय कुडाळचे कर्मचारी आणि आरआरटी टीमला मगरीला पकडण्यात अखेर यश आले. या संपूर्ण मोहिमेत पिंगुळीच्या ग्रामस्थांनी मोलाचे सहकार्य केले.
जेरबंद केल्यानंतर कुडाळ येथील पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत मगरीची कसून तपासणी करण्यात आली. मगरीला कोणतीही इजा किंवा जखम झाली नसल्याची खात्री पटल्यानंतर, वनविभातर्फे तिला तिच्या नैसर्गिक अधिवासात सुरक्षितपणे सोडण्यात आले.
मार्गदर्शन आणि सहभाग
सदर यशस्वी कारवाई उपवनसंरक्षक सावंतवाडी मिलिंद शर्मा आणि सहायक वनसंरक्षक सुनील लाड यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यामध्ये कुडाळचे वनक्षेत्रपाल चेतन पाटील, नेरुरचे वनपाल सूर्यकांत सावंत, नेरुरचे वनरक्षक समीर खरवत आणि तुळसचे वनरक्षक सागर भोजने यांच्या उपस्थितीत ही मोहीम राबवण्यात आली.
तसेच जलद बचाव पथकाचे (RRT) सदस्य अनिल गावडे, प्रसाद गावडे, वैभव अमृस्कर, सुशांत करंगुटकर, संतोष इब्रामपुरकर, यशवंत कदम आणि राहुल महेकर यांनी प्रत्यक्ष सहभाग घेत हे धाडसी बचाव कार्य पूर्ण केले. या अत्यंत जोखमीच्या मोहिमेबद्दल वनविभागाच्या संपूर्ण पथकाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.











