ऐतिहासिक क्षण ! शिवरायांच्या १२ किल्ल्यांना 'जागतिक वारसा' प्रमाणपत्र

मंत्री आशिष शेलार फ्रान्स दौऱ्यावर
Edited by:
Published on: February 10, 2026 18:04 PM
views 37  views

सिंधुदुर्ग : महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून, छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याची साक्ष देणाऱ्या १२ किल्ल्यांना आता अधिकृतपणे युनेस्कोचे जागतिक वारसा प्रमाणपत्र मिळणार आहे. हे ऐतिहासिक प्रमाणपत्र स्वीकारण्यासाठी सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार शिष्टमंडळासह पॅरिसला रवाना झाले. 

११ ते १६ फेब्रुवारी २०२६ दरम्यान पॅरिसमध्ये हा गौरव सोहळा पार पडणार आहे. रायगड, राजगड, शिवनेरीसह एकूण १२ किल्ल्यांना 'जागतिक वारसा' म्हणून मान्यता मिळाली आहे. युनेस्को मुख्यालयात बसवण्यात आलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला मंत्री शेलार मानवंदना देणार आहेत. कोकणातील कातळशिल्पे, पंढरपूरची वारी आणि दहीहंडीलाही जागतिक दर्जा मिळवून देण्यासाठी या दौऱ्यात प्रयत्न होणार आहेत. 

या किल्ल्यांचा समावेश

या जागतिक वारसा यादीत रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरी, लोहगड, साल्हेर, सिंधुदुर्ग, सुवर्णदुर्ग, विजयदुर्ग, खांदेरी आणि तामिळनाडूतील जिंजी किल्ल्याचा समावेश आहे.

छत्रपती शिवरायांच्या गड-किल्ल्यांचा हा जागतिक सन्मान म्हणजे महाराष्ट्राच्या पराक्रमाचा गौरव आहे. तसेच, पॅरिसमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करणे हा भारतीय लोकशाहीच्या मूल्यांचा आंतरराष्ट्रीय स्तरावर सन्मान आहे." 

- ॲड. आशिष शेलार, सांस्कृतिक कार्य मंत्री