LIVE UPDATES

Non-dairy paneer ban : महाराष्ट्रात बनावट 'ॲनालॉग पनीरवर' बंदी, एफडीएचा आदेश

Fake paneer ban Maharashtra : महाराष्ट्राच्या विधानसभेत एनलॉग चीजचा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. त्यावेळी लोकप्रतिनिधींनी ॲनालॉग चीजवर पूर्ण बंदी घालण्याची मागणी केली होती. आता त्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत सरकारने संपूर्ण राज्यात त्यावर बंदी घातली आहे.
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: August 05, 2026 14:17 PM
views 73  views
Analogue paneer Photo

मुंबई : महाराष्ट्रात 'ॲनालॉग चीज' म्हणजेच नॉन-डेअरी पनीरच्या विक्रिवर बंदी घालण्यात आली आहे. सार्वजनिक आरोग्याचा विचार करून महाराष्ट्र सरकारने हा निर्णय घेतला आहे. याबाबतचा निर्णय एफडीएने जारी केला आहे. या निर्णयामुळे, छत्तीसगडनंतर अशी बंदी लागू करणारे महाराष्ट्र हे देशातील दुसरे राज्य बनले आहे. (Maharashtra FDA Bans Fake Analogue and Non-Dairy Paneer Across the State)

ॲनालॉग पनीर म्हणजे काय?

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, ॲनालॉग पनीर हे दुधापासून न बनवता एका रासायनिक प्रक्रियेद्वारे तयार केले जाते. हे पनीर बनविण्यासाठी स्किम्ड मिल्क पावडर, पाम तेल, वनस्पती फॅट्स तसेच केमिकल्सचे एकत्र मिश्रण करुन तयार केले जाते. 

महाराष्ट्राच्या विधानसभेत एनलॉग चीजचा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. त्यावेळी लोकप्रतिनिधींनी ॲनालॉग चीजवर पूर्ण बंदी घालण्याची मागणी केली होती. आता त्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत सरकारने संपूर्ण राज्यात त्यावर बंदी घातली आहे. एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंडे यांनी ३० जुलै रोजी याबाबतचे आदेश जारी केले.

ॲनालॉग चीजच्या उत्पादन, विक्री, साठवणूक, वाहतूक आणि वितरणावर पूर्ण बंदी घातली आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत कठोर कारवाई केली जाईल, असे सरकारने स्पष्ट केले आहे. गुन्ह्याच्या गांभीर्यानुसार, शिक्षेमध्ये सहा महिन्यांपर्यंतचा कारावास आणि १ लाख रुपयांपर्यंतच्या दंडाचा समावेश असू शकतो. असुरक्षित अन्नपदार्थांच्या सेवनामुळे एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास, कायद्यात जन्मठेपेची शिक्षा आणि किमान १० लाख रुपयांच्या दंडाची तरतूद आहे.