सावंतवाडी : विश्वंभर चौधरी व अँड. असीम सरोदे यांच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात आयोजित केलेल्या “निर्भय बनो ”सभा या राजकीय प्रेरित व मातोश्रीची सुपारी वजा वकीलपत्र घेऊन केलेला एक केविलवाणा राजकीय प्रयोग होता असा टोला माजी आरोग्य सभापती अँड. परिमल नाईक यांनी हाणला.
'निर्भय बनो' सभा म्हणजे अराजकीय कारण पुढे करून शतप्रतिशत राजकीय व लोकसभा प्रचाराचा नारळ हातात घेऊन दिलेलं अवास्तव प्रवचनाचा एक देखावा होता. अँड सरोदे यांनी आपल्या भाषणाची सुरूवातीला ही सभा म्हणजे विचारांची सभा असल्याचे विधान केले. परंतू, संपूर्ण सभेचा परामर्श घेता ही एक प्रचार सभा असल्याचे दृढतर होत आहे. अँड. सरोदे यांनी संविधान व कायदेशीर तरतुदी या विषयी आपल्या भाषणात फारसा उल्लेख न करता केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी व नारायण राणे यांच्यावर टीका टिपणी व अनाठायी आरोप करण्यातच धन्यता मानली असं मत अँड. नाईक यांनी व्यक्त केले.
भारतीय संविधान एक राष्ट्रीय ग्रंथ असून तो अबाधित व सुरक्षित आहे. मोदी सरकारने तशी हमी सुद्धा दिलेली आहे. या पूर्वी वेळोवेळी केलेल्या घटनादुरुस्ती यांचं सोयीस्कर समर्थन करताना अँड. सरोदे नरेंद्र मोदी यांच्या कार्यप्रणालीवर विनाकारण संशय निर्माण करून जनतेत संविधान विषयी संभ्रम निर्माण करत आहेत. कलम 370 हटऊन मोदी सरकारने केलेली धीट व जगात प्रशंसा केलेली अद्वितीय कारवाई या बद्दल कदाचित त्यांना व त्यांच्या सहकाऱ्यांना पोटशूळ व भारतीय नागरिक असून सुद्धा दारुण पराभव वाटत असेल म्हणूनच केवळ प्रसिद्धी करिता ते बदनामी नाट्य पुढे करून वणवण फिरत आहेत. जहाल व ललकारीयुक्त विधाने केल्यावर शांततेचा भंग होणारी कृत्ये घडतील व परिणामी पुणे येथील घडलेल्या प्रकाराची पुनरावृत्ती होईल व याचा फायदा निवडणुकीत आपल्या सगेसोयऱ्यांना मीळेल हा कुटील डाव या मागे असून “ताकाला जाऊन भांडे लपवण्यासारखा”हा एक अघोरी प्रकार आहे. कोकणी जनता भूतानुभवातून बरंच काही शिकलेली असल्याने विरोधकांचे तत्सम मनसुबे मुळीच यशस्वी होणार नाहीत. भय आणि निर्भय या मधील सुवर्णमध्य हरवलेलं एक रटाळ प्रवचन आजच्या सभेच्या माध्यमातून पहायला मिळालं. अँड. सरोदे हे एक वैफल्यग्रस्त असामी असून त्यांनी विधानसभा आमदार अपात्रतेच्या चौकशीच्या वेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने सहाय्य्क वकील म्हणून चाकलेली पराभवाची फळे व खालेल्या चपराकीचे चटके ते अजूनही विसरलेले नाहीत. म्हणूनच ते लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून भा. ज. पा. व लोकनेते नरेंद्र मोदी व इतर नेत्यांबद्दल बेताल व विपर्यास करणारी वक्तव्य, निर्भयता व संविधान सारखे संवेदनशील विषय विनाकारण पुढे करून करत सुटले आहेत.वस्तुत:आम जनतेमध्ये कोणताही भय नसून विरोधक मोदी यांना मिळत असलेल्या सकारात्मक प्रतिसादामुळे भयभीत झालेले आहेत.
मला वकिली व्यवसाय व वकील वर्ग यांच्या बद्दल नितांत आदर आहे. वकील लोक फी घेऊन वकीलपत्र दाखल करतात व प्रामाणिकपणे काम पाहतात हे आजपर्यंत माहिती होतं. पण सुपाऱ्या घेऊन स्तुतीपाठकाचे सोंग घेतात हे या निमित्ताने नव्याने पहायला मिळालं. त्यामुळे त्यांच्या विश्वासहार्यता धोक्यात येण्याची शक्यता आहे.
नारायण राणे यांच राजकीय वय असेल तेव्हढ अँड. सरोदे यांचे पूर्ण वय नाही. राणेंनी आपल्या राजकीय कारकिर्दीत देश, महाराष्ट्र राज्य व प्रामुख्याने मुबंई व कोकण प्रांतासाठी दिलेलं योगदान सर्वश्रुत आहे. त्यांना मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री, विरोधी पक्ष नेता आदी मिळालेली विविध पदे त्यांच्या स्व कर्तृत्वावर व परिपूर्ण कार्यक्षमतेच्या निकषावर मिळालेली आहेत. त्यामुळे सरोदेंच्या जनसामन्यातील आदर भंपक व धादांत खोडसाळ वक्तव्याने मुळीच कमी होणार नाही. लोकसभा निवडणूक कालावधीत अराजकीय विचार सभेची खोडसाळ परवानगी घेऊन तसेच बेताल वक्तव्य व आरोप केल्याकारणाने निवडणूक आचार संहितेचा त्यांनी भंग केला म्हणून फौजदारी गुन्ह्यास पात्र असलेला गुन्हा दाखल करावा अशी मागणी निवडणूक अधिकारी यांच्याकडे करण्यात येणार आहे. राणे पर्व उदयास येण्यापूर्वी कोकणातील राजकीय नेत्यांना नेहमीच वाटाण्याच्या अक्षता लावण्याचे काम राज्यस्तरीय राजकारण्यांनी केलं परंतु राणे यांनी स्वकर्तृत्वावर स्व. बाळासाहेब ठाकरे व इतर राजकीय श्रेष्ठीची मने जिंकून आपलं एक अलौकिक वलंय निर्माण केलं. कोकणात एक विकासात्मक दबदबा निर्माण केला. येत्या निवडणुकीत विरोधकांना लाजिरवाण्या पराभवाची चाहूल लागलेली असल्याने व त्यांच्या पायाखालची वाळू सरकू लागल्याने ते असले असफल प्रयोग चौका चौकात करत आहेत. परंतु कोकणी जनता सुज्ञ व परिपक्व असून असल्या भुलथापाना अजिबात बळी पडणार नाहीत व त्याचे स्वाभाविक पडसाद 4 जूनला पहायला मिळतील असं मतं अँड. परिमल नाईक यांनी व्यक्त केले.