LIVE UPDATES

तुतारी एक्स्प्रेस तब्बल चार तास उशिराने

प्रवाशांचा संताप
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: June 23, 2026 15:24 PM
views 52  views

मुंबई : दादर स्थानकावरून रात्री 12.05 वाजता सुटणारी दादर–सावंतवाडी तुतारी एक्स्प्रेस तब्बल चार तास उशिराने धावत असल्याने प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला आहे. अनेक स्थानकांवर ही गाडी वारंवार आणि जास्त वेळ थांबत असल्याने प्रवासी हैराण झाले आहेत.

दादर वरून सुटणारी तुतारी एक्सप्रेस पहाटे चार वाजता सुटली आहे. रात्रभर प्रवाशांना रेल्वेची वाट पाहावी लागली. पहाटे चार वाजता सुटलेली ट्रेन पुढे तरी सुरळीत जाईल असे प्रवाशांना वाटत होते. मात्र पुढे घाटकोपरला दीड तास थांबली. तर पनवेल वरून सकाळी साडे आठ वाजता सुटली. गाडीच्या सततच्या विलंबामुळे प्रवाशांचा संताप व्यक्त होत होता. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, महिला, लहान मुले आणि कामानिमित्त गावी जाणाऱ्या प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत.

प्रवाशांच्या म्हणण्यानुसार, गाडी सुरुवातीपासूनच विलंबाने धावत असून मधल्या अनेक स्थानकांवर ती अपेक्षेपेक्षा जास्त वेळ थांबत आहे. त्यामुळे आधीच झालेला उशीर आणखी वाढत चालला आहे. अनेक प्रवाशांच्या पुढील प्रवासाचे नियोजन कोलमडले आहे. विविध कामांसाठी, तसेच सुट्टीसाठी गावी जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी असते. रात्रीची ही महत्त्वाची गाडी वेळेवर धावली नाही तर संपूर्ण प्रवासाचे वेळापत्रक बिघडते. सध्या तुतारी एक्स्प्रेसच्या विलंबामुळे नेमके कोणते तांत्रिक किंवा वाहतूक व्यवस्थापनाचे कारण आहे, याबाबत अधिकृत माहिती मिळालेली नाही. जिल्हा वासियांसाठी सुटलेल्या या रेल्वेला प्रवासी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो. नेहमी ही ट्रेन हाऊसफुल असते. असे असताना ही ट्रेन वारंवार उशिराने का धावते असा सवाल प्रवासी वर्गातून विचारला जात आहे.