
कोल्हापूर : मंगळवारी रात्री उशिरा मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय बैठक झाली. विषय होता गोकुळच्या आगामी निवडणुकीचा. आगामी निवडणूक महायुती म्हणून सर्वजण एक दिलाने आणि एकत्र लढवतील अशी मुख्यमंत्र्यांनी सूचना केली आणि त्याला महायुतीमधील सर्वच नेत्यांनी संमती दर्शवली. राज्याच्या सहकार विश्वात आणि दुग्ध क्रांती मध्ये गोकुळचे योगदान आणि स्थान मोठे आहे.
हजारो दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या आयुष्यात आर्थिक सुबत्ता आणणाऱ्या गोकुळची वाटचाल अधिक विकासात्मक आणि जोमाने होण्यासाठी सर्वांनीच सक्रिय रहावे असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. त्याला महायुतीमधील सर्वच नेत्यांनी सहमती दर्शवली. या बैठकीला नामदार चंद्रकांत दादा पाटील, हसन मुश्रीफ, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, खासदार धनंजय महाडिक, आमदार चंद्रदीप नरके, आमदार शिवाजीराव पाटील, आमदार राजेश क्षीरसागर, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, आमदार विनय कोरे, गोकुळचे अध्यक्ष नवीद मुश्रीफ, संचालिका शौमिका महाडिक, समित कदम उपस्थित होते. गोकुळची आगामी निवडणूक महायुती म्हणून एकसंघ पद्धतीने लढवली जाईल यावर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीमध्ये शिक्कामोर्तब करण्यात आले.














