LIVE UPDATES

अत्याधुनिक फ्लाइंग इलेक्ट्रिक बोट मुंबईत दाखल

जलवाहतूक क्षेत्रात नवी क्रांती
Edited by: विनायक गांवस
Published on: May 28, 2026 17:33 PM
views 209  views

  • देवेंद्र फडणवीसांची दुरदृष्टी ; नितेश राणेंची अंमलबजावणी 

मुंबई : मुंबईच्या जलवाहतूक क्षेत्रात आज एक ऐतिहासिक आणि क्रांतिकारी पाऊल पडले आहे. जगातील अत्यंत अत्याधुनिक आणि पर्यावरणपूरक मानली जाणारी 'कॅंडेला पी-१२' (Candela P-12) ही फ्लाइंग इलेक्ट्रिक बोट मुंबईत दाखल झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे दूरदर्शी नेतृत्व आणि मंत्री नितेश राणे यांच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प प्रत्यक्षात आला असून, यामुळे मुंबईकरांना अधिक वेगवान, सुरक्षित आणि प्रदूषणमुक्त जलप्रवासाचा एक अनोखा आणि आधुनिक अनुभव मिळणार आहे.


कॅंडेला पी-१२' ही बोट तिच्या वैशिष्ट्यपूर्ण 'हायड्रोफॉइल तंत्रज्ञाना'साठी जगभरात प्रसिद्ध आहे. या तंत्रज्ञानामुळे ही बोट पाण्याच्या पृष्ठभागावरून सहजपणे वर उचलली जाते आणि हवेत तरंगल्यासारखी धावते. यामुळे अत्यंत आरामदायी आणि सुरक्षित प्रवास करता येतो. पूर्णपणे इलेक्ट्रिक असलेल्या या बोटीमुळे समुद्रात अजिबात प्रदूषण होणार नाही. ही फ्लाइंग बोट मुंबईकरांसाठी भविष्यकालीन प्रवासाची नवी दिशा ठरणार आहे. प्राथमिक माहितीनुसार, ही सेवा गेटवे ऑफ इंडिया ते अलिबाग आणि एलिफंटा दरम्यान सुरू होणार आहे. यामुळे प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणावर वाचणार आहे. महाराष्ट्राला आधुनिक पायाभूत सुविधा देण्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून आणि दूरदर्शी नेतृत्वातून या जागतिक दर्जाच्या तंत्रज्ञानाची निवड करण्यात आली. तर मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी अंमलबजावणी अत्यंत प्रभावीपणे करून घेतली. त्यांच्या या प्रयत्नांमुळेच महाराष्ट्राच्या जलवाहतूक क्षेत्रात ही नवी क्रांती घडून आली आहे. या अत्याधुनिक सुविधेमुळे मुंबईच्या वैभवात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला असून पर्यावरणपूरक आणि हायटेक वाहतुकीचे एक नवे पर्व महाराष्ट्रात सुरू झाले आहे.