
- वैज्ञानिक संवर्धनाला गती देण्यासाठी सामंजस्य करार
सिंधुदुर्ग : कोकणातील कातळशिल्पांच्या वैज्ञानिक अभ्यासाबरोबरच डिजिटल दस्तावेजीकरण आणि संवर्धनाला चालना मिळणार आहे. पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालये संचालनालयाने रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुमारे ८० गावांमध्ये सर्वेक्षण करून आतापर्यंत जवळपास दोन हजार कातळशिल्पे प्रकाशात आणली आहेत. या कातळशिल्पांचा वैज्ञानिक अभ्यास व्हावा याकरिता संचालनालय आणि आयआयटी मद्रासचा एक प्रमुख विभाग असलेल्या आयआयटीएम प्रवर्तक टेक्नालॉजी फाऊंडेशन यांच्यात सामंजस्य करार झाला. इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता तसेच सांस्कृतिक मंत्री ॲड. आशिष शेलार आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत या करारावर स्वाक्षरी झाली. या कराराअंर्तगत कातळशिल्पांवरील संशोधन, माहिती, डिजिटल अभिलेख, नकाशे, प्रतिमा आणि तांत्रिक साधनसंपत्तीचा प्रभावी वापर होऊन या वारशाच्या जतन व संवर्धनाला चालना मिळणार आहे.
कोकणातील या अनमोल पुरातत्त्वीय आणि सांस्कृतिक वारशाचे महत्त्व लक्षात घेऊन देवीहसोळ, कशेळी, रुंढे तळी, उक्षी, बारसू, जांभरूण, देवाचे गोठाणे, कुडोपी आणि गोवा राज्यातील फंसाईमाळ या नऊ कातळशिल्प स्थळांचा समावेश युनेस्कोच्या जागतिक वारसा नामांकनाच्या तात्पुरत्या यादीत करण्यात आला आहे. प्रामुख्याने प्रागैतिहासिक कालखंडातील या कातळशिल्पांमध्ये हत्ती, एकशिंगी गेंडा, कासव, पाणघोडा, पक्षी, मानवी आकृत्या तसेच अनेक अनाकलनीय आकृत्यांचा समावेश आहे.
सामंजस्य करारामुळे प्रकल्पातून मिळणारी माहिती, संशोधन अहवाल, नकाशे, डिजिटल दस्तावेज आणि अभिलेख यांचे परस्पर आदान-प्रदान सुलभ होणार आहे. तसेच प्रकल्पासाठी वापरण्यात आलेली तांत्रिक उपकरणे आणि संशोधन साधने संचालनालयाकडे हस्तांतरित करण्याची प्रक्रिया सुलभ होईल. याशिवाय कातळशिल्पांवरील पुढील संशोधन, शैक्षणिक सहकार्य, संयुक्त प्रकाशने, ज्ञानप्रसार आणि क्षमता विकास उपक्रमांना प्रोत्साहन मिळणार आहे.














