LIVE UPDATES

Sindhudurg News : बंधारा बांधला, पण पाणी अडणार कसे?

घोडगेतील बंधाऱ्याचे काम वादात; ३० मीटरऐवजी २० मीटर बांधकामाचा आरोप, चौकशीची मागणी
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: September 28, 2026 21:08 PM
views 29  views

सिंधुदुर्गनगरी : पाणी अडविण्यासाठी उभारण्यात आलेल्या बंधाऱ्याच्या कामातच त्रुटी राहिल्या असतील तर पाणी अडणार कसे, असा सवाल जिल्हा परिषद जल व्यवस्थापन व स्वच्छता समितीच्या सभेत उपस्थित करण्यात आला.

कुडाळ तालुक्यातील घोडगे येथील नदीवर आवश्यक ३० मीटरऐवजी केवळ २० मीटरचा बंधारा उभारण्यात आल्याचा आरोप सदस्य दीपक नारकर यांनी केला. शिवाय नदीच्या मध्यभागी बांधण्यात आलेल्या या बंधाऱ्याच्या दोन्ही बाजूंनी पाणी वाहून जात असल्याचे त्यांनी सभेत निदर्शनास आणून दिले. त्यामुळे या कामाची सखोल चौकशी करून जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी त्यांनी केली.

जिल्हा परिषद जल व्यवस्थापन व स्वच्छता समितीची सभा सोमवारी (२८ सप्टेंबर) जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांच्या अध्यक्षतेखाली छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात झाली. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अपूर्वा बासूर, उपाध्यक्ष दादा साईल, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शीतल पुंड, विषय समिती सभापती संतोष साटविलकर, प्रितेश राऊळ, अनुराधा नारकर, रुहिता तांबे, समिती सदस्य मनोज रावराणे, दीपक नारकर, सुनील पारकर, आरती पाटील, सुप्रिया वालावलकर यांच्यासह अधिकारी व खातेप्रमुख उपस्थित होते.

घोडगे येथील बंधाऱ्याचा मुद्दा उपस्थित करताना दीपक नारकर यांनी सांगितले की, नदीवर ३० मीटरचा बंधारा आवश्यक असताना प्रत्यक्षात केवळ २० मीटरचा बंधारा बांधण्यात आला आहे. त्यातही नदीच्या मध्यभागी बांधकाम झाल्याने दोन्ही बाजूंनी पाणी वाहून जात असल्याचा दावा त्यांनी केला. त्यामुळे बंधाऱ्याच्या कामाचे नियोजन, प्रत्यक्ष बांधकाम आणि गुणवत्तेची सखोल तपासणी करून दोषी आढळल्यास संबंधितांवर जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी त्यांनी केली.

आंदुर्ले बंधाऱ्याच्या अंदाजपत्रकावरही प्रश्न

वेंगुर्ले तालुक्यातील आंदुर्ले येथील बंधाऱ्याच्या कामाचा मुद्दाही सभेत उपस्थित झाला. येथे १८ मीटरचा बंधारा आवश्यक असताना त्यासाठी ३० लाख रुपयांचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले होते. मात्र केवळ २० लाख रुपयांच्या अंदाजपत्रकाला प्रशासकीय मान्यता मिळाल्याचे सदस्य आरती पाटील यांनी निदर्शनास आणून दिले. त्यामुळे बंधाऱ्यांच्या कामांचे नियोजन आणि उपलब्ध निधी यामध्ये योग्य समन्वय ठेवण्याची गरज व्यक्त करण्यात आली.

‘निधी खर्चासाठी कामे नकोत’

बंधाऱ्यांसह विविध विकासकामांच्या नियोजनाबाबत अध्यक्ष प्रमोद कामत यांनी अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश दिले. ज्या कामासाठी जेवढा निधी आवश्यक आहे, तेवढ्याच रकमेचे वास्तववादी अंदाजपत्रक तयार करावे. केवळ निधी खर्च करण्यासाठी कमी निधीची कामे हाती घेऊ नयेत. काम पूर्ण झाल्यानंतर नागरिकांना त्याचा प्रत्यक्ष लाभ मिळेल, अशाच पद्धतीने कामांचे नियोजन करावे, असे त्यांनी सांगितले.

काम पूर्ण न करणाऱ्या ठेकेदारावर कारवाईची मागणी

आरवली येथील जलजीवन मिशनच्या कामाचाही विषय सभेत चर्चेला आला. काम पूर्ण झाल्याने पाणी उपलब्ध झाले आहे; मात्र ठेकेदाराने पुढील आवश्यक काम पूर्ण न केल्यामुळे गणेशोत्सवाच्या काळात पाणी उपलब्ध असूनही नागरिकांना त्याचा लाभ देता आला नाही, अशी खंत सभापती प्रितेश राऊळ यांनी व्यक्त केली. काम पूर्ण करण्यास टाळाटाळ करणाऱ्या संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्याचा ठराव मांडण्यात आला.

सार्वजनिक विहिरींवरील खासगी पंपांची माहिती घेण्याची सूचना

संभाव्य दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर आगामी काळात पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सार्वजनिक विहिरींवर बसविण्यात आलेल्या खासगी पंपांची माहिती तातडीने गोळा करावी. ज्या ठिकाणी गरज असेल, तेथे असे पंप काढण्याबाबत कार्यवाही करावी, अशी सूचना सदस्य मनोज रावराणे यांनी केली.

बंधाऱ्यांच्या कामातील नियोजन, अंदाजपत्रक आणि गुणवत्तेचे प्रश्न एकाच सभेत उपस्थित झाल्याने जलव्यवस्थापनाच्या कामांकडे अधिक गांभीर्याने पाहण्याची गरज अधोरेखित झाली.