LIVE UPDATES

Ujjain Shahi Masjid Protest : उज्जैनमध्ये शाही मशिदीचा भाग पाडण्यावरुन राडा, पोलिसांवर दगडफेक

Ujjain Shahi Masjid Protest : सध्या परिसरात शांतता असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. उज्जैनमधल्या अब्दालपुरा भागात शाही मशिदीचा भाग पाडण्यासाठी जेव्हा बुलडोझर आला तेव्हा मशिदीजवळील जमावामध्ये आणि सुरक्षा दलांमध्ये संघर्ष झाला. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. परिस्थिती हाताळण्यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकारीही घटनास्थळी दाखल झाले आहेत.
Edited by: Rajat Sawant
Published on: September 28, 2026 16:01 PM
views 77  views
Security personnel deployed near Ujjain Shahi Masjid amid protests over road widening

नवी दिल्ली : उज्जैनमध्ये 'शाही मशीद'चा काही भाग पाडण्यावरुन सोमवारी गोंधळ उडाला आहे. परिसरात महिलांनी रास्ता रोको केला असून काही लोकांनी पोलिसांवर दगडफेक केली आहे. आगामी 'सिंहस्थ २०२८' निमित्त हाती घेण्यात आलेल्या रस्ता रुंदीकरणाच्या कामात  'शाही मशीद'चा काही भाग अडथळा ठरत आहे.

दरम्यान, 'शाही मशीद'चा काही भाग पाडण्याच्या कारवाईस एका गटाने सहमती दर्शवली होती तर दुसऱ्या गटाने या कारवाई विरोधात आंदोलन पुकारले आहे. सकाळपासूनच मशिदीजवळ लोकांची मोठी गर्दी जमली आणि त्यांनी पोलीस व प्रशासनाविरोधात घोषणाबाजी सुरू केली. या भागात 'रॅपिड ॲक्शन फोर्स'च्या जवानांसह मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

सध्या परिसरात शांतता असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. उज्जैनमधल्या अब्दालपुरा भागात शाही मशिदीचा भाग पाडण्यासाठी जेव्हा बुलडोझर आला तेव्हा मशिदीजवळील जमावामध्ये आणि सुरक्षा दलांमध्ये संघर्ष झाला. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. परिस्थिती हाताळण्यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकारीही घटनास्थळी दाखल झाले आहेत.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आंदोलन प्रकरणी १० जणांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आले आहेत आणि पाच जणांना अटक करण्यात आली आहे. घटनास्थळी २,५०० पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचा मोठा ताफा तैनात करण्यात आला आहे. यामध्ये विभागीय आयुक्त, एडीजी, डीआयजी आणि जिल्हा दंडाधिकारी यांचा समावेश आहे. संपूर्ण शहरात सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली असून सतर्कतेचा इशारा कायम आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, खजूर वाली मशीद आणि जीवाजीगंज पोलीस ठाणे यांच्या दरम्यान २७२ घरे आहेत. रविवारी रात्री पोलीस प्रशासन आणि मशीद समिती यांच्यात झालेल्या परस्पर सामंजस्य करारानंतर मुस्लिम समाजातील सदस्यांनी रस्ता रुंदीकरणाच्या कामात अडथळा ठरणारा मशिदीचा भाग स्वेच्छेने काढून टाकण्यास सहमती दर्शवली होती. मात्र, नंतर काही व्यक्तींनी याला विरोध केला. मशिदीबाहेर जमा झाले आणि आंदोलन पुकारले. दरम्यान, या गोंधळानंतर शहरातील सर्व सरकारी आणि खाजगी शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत.