LIVE UPDATES

Nitesh Rane : लोकसहभागातून जलसंधारणाची कामे प्रभावीपणे राबवावीत

पाणी बचतीसाठी नागरिक, ग्रामपंचायती व स्थानिक संस्थांनी एकत्रितपणे पुढाकार घ्यावा : पालकमंत्री नितेश राणे
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: September 28, 2026 21:22 PM
views 28  views

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आगामी काळातील पाण्याची उपलब्धता सुरक्षित ठेवण्यासाठी आतापासूनच जलसंधारण, पाणी बचत आणि पाण्याचे योग्य नियोजन करणे आवश्यक आहे. यासाठी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकारी-कर्मचारी, ग्रामपंचायती तसेच नागरिकांनी एकत्रितपणे लोकसहभागातून जलसंधारणाची कामे प्रभावीपणे राबवावीत, असे आवाहन मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी लेखी पत्राद्वारे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि जिल्हावासियांना केले आहे.

पाणी ही प्रत्येकाची मूलभूत गरज असून पाण्याचा प्रत्येक थेंब वाचविण्याची सामूहिक जबाबदारी समाजाची आहे. त्यामुळे लोकसहभागातून जलतारा, जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणावर हाती घेऊन स्थानिक पातळीवर उपलब्ध असलेल्या मनुष्यबळ व साधनसामग्रीचा उपयोग करून पाणी अडविणे व जमिनीत मुरविण्यासाठी आवश्यक कामांना प्राधान्य द्यावे. तसेच पाण्याचा काटकसरीने व जपून वापर करण्याबाबत व्यापक जनजागृती करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

गावागावात वनराई बंधारे उभारण्याबरोबरच उपलब्ध जागा व स्थानिक परिस्थितीचा विचार करून पावसाचे पाणी अडविणे व भूजलपातळी वाढविण्यासाठी आवश्यक कामे हाती घ्यावीत. तसेच VB-G RAM G योजनेंतर्गत जलसंधारणाशी संबंधित कामांना प्राधान्य देऊन पात्र कामांची तातडीने निवड करावी आणि प्रत्यक्ष कामांना गती द्यावी. या माध्यमातून सामान्य नागरिकांच्या उत्पन्नवाढीवरही लक्ष केंद्रित करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

प्रत्येक गावात ‘पाणी बचत व जलसंधारण’ हा सामूहिक व वैयक्तिक जबाबदारीचा विषय म्हणून स्वीकारून त्यासाठी लोकप्रतिनिधी व ग्रामस्थांचा सक्रिय सहभाग सुनिश्चित करावा. यासाठी गावपातळीवर जनजागृती करून व्यापक लोकचळवळ उभी करावी. उपलब्ध शासकीय योजनांचा लोकसहभागाशी समन्वय साधून सिंधुदुर्ग जिल्ह्यात जलसंधारणाची व्यापक चळवळ उभी करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

संबंधित प्रशासकीय विभागांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील जलसंधारणाच्या कामांचा नियमित आढावा घेऊन आवश्यक तांत्रिक मार्गदर्शन करावे आणि कामे पूर्ण झाल्यानंतर त्यांची योग्य कार्यवाही करावी. सध्याची परिस्थिती लक्षात घेता उपलब्ध व आगामी पावसाचे पाणी वाहून जाऊ न देता ते अडविणे, जिरविणे आणि उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करणे ही काळाची गरज आहे. या उद्देशाने जिल्ह्यातील सर्व घटकांनी एकत्रितपणे पुढाकार घेऊन जलसंधारणाची कामे प्रभावीपणे राबवावीत, असे आवाहन मंत्री नितेश राणे यांनी केले आहे.