
देवगड : देवगड तालुक्यातील तळवडे परिसरात पावसातील अनियमितता व प्रतिकूल हवामानामुळे भातपिकाचे नुकसान झाल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद सदस्य देवदत्त कदम, पंचायत समिती सदस्य सलोनी तळवडेकर आणि कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी सोमवारी नुकसानग्रस्त भातशेतीची प्रत्यक्ष पाहणी केली.
पालकमंत्री नितेश राणे यांच्या सूचनेनुसार ही पाहणी करण्यात आली. लोकप्रतिनिधींनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन भातपिकाची सद्यस्थिती, झालेल्या नुकसानीचे स्वरूप तसेच शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या अडचणींची माहिती घेतली. यावेळी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांकडूनही पिकाच्या नुकसानीची वस्तुनिष्ठ माहिती घेण्यात आली.
तळवडे परिसरातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या भातपिकाच्या नुकसानीची योग्य प्रकारे नोंद घेऊन पुढील कार्यवाहीसाठी अहवाल तयार करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून लवकरात लवकर मदत मिळवून देण्यासाठी पाठपुरावा केला जाईल, अशी ग्वाही लोकप्रतिनिधींनी दिली.
शासन संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या पाठीशी असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यासाठी आवश्यक कार्यवाही केली जाईल, असेही यावेळी सांगण्यात आले. या पाहणीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा मिळाला.
या पाहणीवेळी जिल्हा परिषद सदस्य देवदत्त कदम, पंचायत समिती सदस्य सलोनी तळवडेकर, कृषी अधिकारी, तलाठी अमरेश सातारकर, माजी सरपंच पंकज दुखंडे, माजी सरपंच गोपाळ रुमडे, ग्रामसेवक गुणवंत पाटील, पोलिस पाटील मुकेश पारकर तसेच शेतकरी अवधूत मोंडकर, एकनाथ धुरी, मनोहर कडू यांच्यासह ग्रामस्थ व शेतकरी उपस्थित होते.










