LIVE UPDATES

Inspirational Story : उपचारांसाठी मिळाली देवमाणसाची साथ अन् प्रवीणला मृत्यूच्या दाढेतून काढले बाहेर

Vikhroli Accident Pravin Ghadigaonkar : भीषण अपघातानंतर घाडीगावकर कुटुंबावर अक्षरशः दुःखाचा डोंगर कोसळला. अवघ्या २५ वर्षांच्या प्रवीणच्या मेंदूला गंभीर दुखापत, चेहऱ्याचा चक्काचूर आणि पायाला फ्रॅक्चर… एका रुग्णालयातून दुसऱ्या रुग्णालयात उपचारांसाठी धावपळ सुरू होती. मात्र, डॉक्टरांनीही “वाचण्याची शक्यता फार कमी आहे” असे सांगितल्यानंतर आई-वडिलांसमोर केवळ अश्रू आणि प्रार्थनाच उरली होती. मृत्यूच्या दारात उभ्या असलेल्या आपल्या मुलाला परत आणण्यासाठी आई-वडिलांची सुरू असलेली धडपड… आणि त्याचवेळी मिळालेली एका देवमाणसाची साथ… यामुळे प्रवीणच्या आयुष्याला नवी आशा मिळाली.
Edited by: लक्ष्‍मण आडाव
Published on: September 24, 2026 15:35 PM
views 144  views
Pravin Ghadigaonkar recovers after Vikhroli accident and treatment

सिंधुदुर्ग : “साहेब, आमचा मुलगा वाचवा हो… काहीही करा, पण त्याला परत आणून द्या!” आई-वडिलांची ही आर्त हाक, डोळ्यांत दाटलेली भीती आणि मृत्यूशी झुंज देणारा अवघा २५ वर्षांचा प्रवीण… विक्रोळीतील भीषण अपघातानंतर घाडीगावकर कुटुंबावर अक्षरशः आभाळच कोसळले होते. मेंदूला गंभीर दुखापत, चेहऱ्याचा चक्काचूर आणि पायाला झालेली गंभीर दुखापत, अशा अवस्थेत प्रवीणला एका रुग्णालयातून दुसऱ्या रुग्णालयात हलविण्यात आले. अखेर डॉक्टरांनीही त्याच्या जगण्याची शक्यता अत्यंत कमी असल्याचे सांगितल्याने कुटुंबीयांच्या पायाखालची जमीनच सरकली.

मात्र, जिथे वैद्यकीय उपचारांची आशा धूसर होते, तिथे माणुसकीची साथ आणि श्रद्धेची ताकद एखाद्या नव्या आशेचा किरण ठरते, याचा प्रत्यय प्रवीणच्या बाबतीत आला. प्रवीणच्या अपघाताची माहिती गावात समजताच करंजेच्या सरपंच सपना मेस्त्री आणि विभागातील जिल्हा परिषद सदस्य मनोज रावराणे यांनी तातडीने मदतीसाठी प्रयत्न सुरू केले. त्यांनी खासदार नारायण राणे आणि पालकमंत्री नितेश राणे यांचे निकटवर्तीय कार्यकर्ते तसेच आरोग्यविषयक मदतीसाठी तत्पर असलेले भाजप मुंबई सचिव (कामगार आघाडी) नामदेव चव्हाण यांच्याशी संपर्क साधून प्रवीणच्या उपचारांसाठी तातडीची मदत करण्याची विनंती केली.

ही माहिती मिळताच नामदेव चव्हाण यांनी क्षणाचाही विलंब न करता मदतीसाठी धाव घेतली. मध्यरात्रीचा एक वाजला होता. मुंबई झोपेत असताना एका अनोळखी तरुणाचे आयुष्य वाचविण्यासाठी नामदेव चव्हाण स्वतः कोकिलाबेन रुग्णालयाच्या दारात पोहोचले. त्यांनी प्रवीणला तातडीने अतिदक्षता विभागात दाखल करून पुढील उपचारांसाठी आवश्यक ती मदत उपलब्ध करून दिली. यानंतर तब्बल दोन महिने प्रवीणची मृत्यूशी झुंज सुरू होती. डॉक्टरांचे पथक रात्रंदिवस उपचार करत होते, तर रुग्णालयाबाहेर नामदेव चव्हाण हे घाडीगावकर कुटुंबाचा खंबीर आधार बनून उभे होते.

प्रवीणवर चेहऱ्याची गुंतागुंतीची प्लास्टिक सर्जरी करण्यात आली. मेंदूवरील गंभीर दुखापतीवरही उपचार करण्यात आले. प्रत्येक दिवस कुटुंबीयांसाठी काळजीचा आणि आशेचा होता.आणि अखेर… प्रवीणने डोळे उघडले! त्याच्या चेहऱ्यावर हास्य उमटले आणि मृत्यूच्या सावटाखाली गेलेल्या एका कुटुंबाच्या आयुष्यात पुन्हा आनंद फुलला.

या दोन महिन्यांच्या उपचारांचा खर्च तब्बल २५ लाख रुपये झाला. सामान्य कुटुंबासाठी एवढी मोठी रक्कम उभी करणे अशक्यप्राय होते. मात्र, नामदेव चव्हाण यांच्या विशेष प्रयत्नांमुळे प्रवीणच्या उपचारांचा संपूर्ण २५ लाख रुपयांचा खर्च मोफत झाला, अशी माहिती कुटुंबीयांनी दिली.

दोन महिन्यांच्या उपचारांनंतर प्रवीण सुखरूपपणे आपल्या करंजे (गावठणवाडी) या गावी परतला. प्रवीणला आपल्या डोळ्यांसमोर पाहताच घाडीगावकर कुटुंबीयांच्या डोळ्यांतून अश्रूंच्या धारा लागल्या. मात्र, हे अश्रू दुःखाचे नव्हते… ते होते कृतज्ञतेचे! प्रवीणला नवजीवन मिळाल्याने संपूर्ण गाव भावूक झाले. यावेळी घाडीगावकर परिवार, सरपंच सपना मेस्त्री, माजी सरपंच मंगेश तळगावकर आणि ग्रामस्थांनी राणे साहेब तसेच नामदेव चव्हाण यांचे मनापासून आभार मानले.

नामदेव चव्हाण यांचा सत्कार करताना कुटुंबीय गलबलून म्हणाले, “आज आमचा मुलगा आमच्यासमोर उभा आहे, हे तुमच्यामुळे शक्य झाले. तुम्ही केवळ २५ लाख रुपयांचे उपचार मोफत मिळवून दिले नाहीत, तर आमच्या घराचा दिवा विझण्यापासून वाचवला.”

प्रवीणच्या घरी पुन्हा उमटलेले हास्य आणि आई-वडिलांच्या डोळ्यांत आलेले आनंदाश्रू… या संपूर्ण घटनेत माणुसकीच्या हाताने मृत्यूच्या दारातून एका तरुणाला पुन्हा आयुष्याकडे आणल्याची भावना गावकऱ्यांच्या मनात कायमची कोरली गेली आहे.