LIVE UPDATES

Maharashtra Board Exam 2027 : 10 वी, 12 वी बोर्डाच्या परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर

Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: September 18, 2026 17:42 PM
views 32  views

मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता १० वी व १२ वीच्या बोर्ड परीक्षेच्या तारखा जाहीर केल्या आहेत. शाळा, इतर शैक्षणिक संस्था आणि विद्यार्थ्यांना त्यांचे शैक्षणिक वेळापत्रक आखण्यासाठी व परीक्षेची तयारी करण्यासाठी पुरेसा वेळ मिळावा, या उद्देशाने बोर्ड परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर केले आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जाहीर केलेल्या प्रसिध्दिपत्रकानुसार, एचएससी (इयत्ता १२ वी) च्या लेखी परीक्षा ८ फेब्रुवारी ते १६ मार्च २०२७ या कालावधीत होतील, तर एसएससी (इयत्ता १० वी) च्या लेखी परीक्षा १५ फेब्रुवारी ते ११ मार्च २०२७ या कालावधीत घेतल्या जातील.

इयत्ता १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रात्यक्षिक, तोंडी आणि अंतर्गत मूल्यमापन परीक्षा २० जानेवारी ते ६ फेब्रुवारी २०२७ या कालावधीत घेतल्या जातील. तर इयत्ता १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रात्यक्षिक, श्रेणी-आधारित, तोंडी आणि अंतर्गत मूल्यमापन परीक्षा २८ जानेवारी ते १३ फेब्रुवारी २०२७ या कालावधीत होतील. 

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छ. संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत फेब्रु मार्च २०२७ मध्ये परीक्षा घेतल्या जातील.

फेब्रुवारी-मार्च २०२७ च्या परीक्षांसाठी सध्या जाहीर करण्यात आलेल्या तारखा संभाव्य आहेत. लेखी परीक्षांचे सविस्तर आणि विषयनिहाय वेळापत्रक नंतरच्या काळात स्वतंत्रपणे जाहीर केले जाईल असे मंडळाने जाहिर केलेल्या प्रसिध्दिपत्रकात स्पष्ट केले आहे.