
देवगड : गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी तारामुंबरीत पाऊल ठेवताना यंदा भक्तांना केवळ भक्तीचा अनुभव मिळणार नाही, तर हजारो वर्षांचा इतिहास, देशोदेशीची संस्कृती आणि जगभरातील चलनविश्व जवळून अनुभवण्याची अनोखी संधी मिळणार आहे. खवळे महागणपतीच्या शेजारी असलेल्या शिवबा सदनमध्ये १४ ते २५ सप्टेंबरदरम्यान साकारलेले ‘अष्टांग शैक्षणिक नोटा संग्रह’ हे दुर्मिळ नाणी, नोटा आणि पोस्टाच्या तिकिटांचे प्रदर्शन सध्या विशेष आकर्षण ठरत आहे.
नाणे किंवा नोट म्हटले की आपल्या डोळ्यांसमोर केवळ व्यवहारासाठी वापरले जाणारे चलन येते. मात्र प्रत्येक नाण्याच्या मागे एखाद्या देशाचा इतिहास, संस्कृती, राजसत्ता, राजचिन्हे, परंपरा आणि बदलत्या काळाची कहाणी दडलेली असते. हीच कहाणी प्रत्यक्ष नाणी आणि नोटांच्या माध्यमातून सर्वांसमोर आणण्याचा प्रयत्न या प्रदर्शनातून करण्यात आला आहे. त्यामुळे हे प्रदर्शन केवळ संग्रह पाहण्यापुरते मर्यादित न राहता इतिहास, भूगोल, संस्कृती, अर्थव्यवस्था आणि कला यांचा प्रत्यक्ष धडा देणारे ज्ञानदालन ठरणार आहे.
तारामुंबरीचे सुपुत्र विजय हिरोजी खवळे यांनी आपल्या जिद्दीतून आणि छंदातून हा अनोखा संग्रह उभा केला आहे. मुंबई महानगरपालिका शाळेत शिक्षक म्हणून सेवा बजावताना त्यांनी विद्यार्थीप्रिय शिक्षक म्हणून ओळख निर्माण केली. त्याचबरोबर पर्यावरणप्रेमी म्हणूनही त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा, त्यांच्या जिज्ञासेला चालना मिळावी आणि पालक व विद्यार्थ्यांना विविध विषयांचे ज्ञान मिळावे, या हेतूने ते आजही कार्यरत आहेत.
आपल्या तालुक्यातील आणि जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनाही या ज्ञानसंपदेचा प्रत्यक्ष अनुभव मिळावा, या विचारातून त्यांनी आपल्या संग्रहाचे हे प्रदर्शन भरविले आहे. विशेष म्हणजे १५ ऑगस्ट १९४७ पासून आजपर्यंतच्या भारतीय चलनाचा प्रवास येथे पाहता येणार आहे. स्वातंत्र्यानंतरच्या काळातील विविध नाणी व नोटा, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अर्थात RBI शी संबंधित चलन, UNC प्रकारातील नाणी-नोटा, तसेच काळाच्या ओघात वापरातून गेलेल्या विविध चलनांचा संग्रह या प्रदर्शनात मांडण्यात आला आहे.
भारताच्या इतिहासाच्या पाऊलखुणाही या संग्रहातून अनुभवता येणार आहेत. भारतातील जुन्या संस्थानांतील नाणी, तत्कालीन राजांच्या काळातील चलन, भारतीय प्राचीन काळातील मौल्यवान व दुर्मिळ नाणी, तसेच इंग्रजांच्या राजवटीतील टोकन, कॉइन्स आणि नोटा यामुळे भारतीय चलनाच्या इतिहासाचा मोठा पटच येथे उलगडणार आहे.
पण या प्रदर्शनाचे विश्व केवळ भारतापुरते मर्यादित नाही. जगातील सुमारे ३०० देशांतील नाणी, नोटा आणि पोस्टाची तिकिटे, विविध प्रकारच्या रंगीत नाणी-नोटा, वेगवेगळ्या देशांची राजचिन्हे आणि झेंडे पाहण्याची संधी या प्रदर्शनात मिळणार आहे. एखाद्या नाण्यावर उमटलेले राजचिन्ह, एखाद्या नोटेवरील व्यक्तिमत्त्व, एखाद्या देशाचा झेंडा किंवा चलनावरील चित्र यामागे त्या देशाचा इतिहास आणि संस्कृती दडलेली असते. त्यामुळे प्रत्येक वस्तू ही स्वतःमध्ये एक छोटी इतिहासकथा सांगणारी ठरते.
विद्यार्थ्यांसाठी तर हे प्रदर्शन विशेष महत्त्वाचे ठरणार आहे. पुस्तकात वाचलेला इतिहास प्रत्यक्ष नाणे-नोटांच्या माध्यमातून डोळ्यांसमोर पाहण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळणार आहे. देश, राजधानी, चलन, राजचिन्हे, इतिहास आणि संस्कृती यांची माहिती एका वेगळ्या पद्धतीने समजून घेण्यासाठी हे प्रदर्शन उपयुक्त ठरू शकते. जिज्ञासू पालक, इतिहासप्रेमी, अभ्यासक आणि संग्रहाची आवड असणाऱ्यांसाठीही येथे पाहण्यासारखे बरेच काही आहे.
या प्रदर्शनाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ते सर्वांसाठी मोफत खुले आहे. दि. १४ ते २५ सप्टेंबरदरम्यान सकाळी ८ ते रात्री ८ वाजेपर्यंत शिवबा सदन, खवळे महागणपतीच्या शेजारी, तारामुंबरी येथे हे प्रदर्शन पाहता येणार आहे.
गणेशोत्सव म्हणजे श्रद्धा, भक्ती आणि संस्कृतीचा उत्सव. त्याच उत्सवात इतिहास आणि ज्ञानाची जोड मिळाली तर त्याचे महत्त्व आणखी वाढते. खवळे महागणपतीचे दर्शन घेतल्यानंतर काही पावले पुढे जाताच नाणी-नोटांच्या माध्यमातून भारतापासून जगभराची सफर घडविणारे हे अनोखे दालन गणेशभक्तांना अनुभवता येणार आहे.
‘गणरायाचे दर्शन घ्या; पण त्यासोबत शिवबा सदनमध्ये आयोजित या मोफत प्रदर्शनाचा आवर्जून लाभ घ्या,’ असे आवाहन आयोजक व संयोजक विजय खवळे यांनी केले आहे. म्हणूनच यंदा तारामुंबरीला गेल्यावर फक्त गणपती बाप्पाचे दर्शन घेऊन परतू नका... क्षणभर थांबा, नाण्यांवर कोरलेला इतिहास वाचा, नोटांवर उमटलेली संस्कृती अनुभवा आणि जगभरातील चलनविश्वाची ही अनोखी सफर नक्की करून या!
‘चला तर... गणरायाच्या दर्शनासोबत इतिहासाच्या या अद्भुत खजिन्याचीही सफर करूया!’
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all










