LIVE UPDATES

Nitesh Rane Fisheries Study Tour : आंध्र प्रदेशच्या मत्स्यव्यवसायातील आधुनिक प्रयोगांचा महाराष्ट्रात उपयोग करणार

आंध्रप्रदेशाच्या मत्स्यआयुक्तालयाला मंत्री नितेश राणे यांची भेट : तंत्रज्ञानाधारित, शाश्वत आणि जागतिक स्तरावर स्पर्धात्मक मत्स्य परिसंस्था उभारण्यावर भर
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: October 08, 2026 18:18 PM
views 47  views

विजयवाडा : आंध्र प्रदेशच्या दोन दिवसीय अभ्यास दौऱ्यादरम्यान आज मत्स्यव्यवसाय क्षेत्रात आघाडीवर असलेल्या आंध्र प्रदेशच्या मत्स्य आयुक्तालयाच्या मुख्यालयास भेट देऊन राज्यातील मत्स्यव्यवसाय व अ‍ॅक्वाकल्चर क्षेत्राच्या विकास मॉडेलचा सविस्तर अभ्यास करण्यात आला. यावेळी मत्स्यव्यवसाय क्षेत्रातील विविध आधुनिक तंत्रज्ञान, उत्पादकता वाढ, मच्छीमार कल्याण तसेच एकात्मिक मत्स्य मूल्यसाखळीबाबत सविस्तर माहिती व आढावा घेण्यात आला.

आंध्र प्रदेशच्या मत्स्य आयुक्तालयात झालेल्या बैठकीत सागरी मत्स्यव्यवसाय, अंतर्देशीय मत्स्यव्यवसाय आणि अ‍ॅक्वाकल्चर क्षेत्रातील उत्पादकता वाढविण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपाययोजनांवर सविस्तर सादरीकरण करण्यात आले. यावेळी आंध्र प्रदेशचे मत्स्य आयुक्त रामा नाईक, अतिरिक्त संचालक डॉ. शंकर राव, महाराष्ट्राचे पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यव्यवसाय विभागाचे सचिव एन. रामास्वामी, मत्स्य आयुक्त भानुदास पालवे, महाराष्ट्र मत्स्योद्योग महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश खपले, मत्स्यव्यवसाय तज्ज्ञ मनोज शर्मा, सहआयुक्त महेश देवरे, नागनाथ भादुले यांच्यासह आंध्र प्रदेश व महाराष्ट्रातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

AI आधारित Aquaculture 4.0, मत्स्य आरोग्य व रोगांचे निरीक्षण, पाण्याच्या गुणवत्तेचे रिअल-टाइम परीक्षण, स्मार्ट फीडिंग, माशांच्या वर्तनाचे विश्लेषण, RAS व Biofloc, IoT आधारित अ‍ॅक्वाकल्चर, डिजिटल ट्रेसेबिलिटी, तलाव नोंदणी, प्रजाती विविधीकरण, बोटींचे ट्रॅकिंग आणि मासेमारीतील पकड निरीक्षण याबाबत माहिती घेण्यात आली.

तसेच समुद्री शेवाळ लागवड, कृत्रिम प्रवाळ भित्तिका, खुल्या समुद्रातील केज कल्चर, हवामान बदलास सक्षम किनारी मच्छीमार गावे आणि अंतर्देशीय जलस्रोतांचा शास्त्रीय पद्धतीने उपयोग या विषयांचाही अभ्यास करण्यात आला.

हॅचरी, मत्स्य खाद्य, प्रयोगशाळा, मत्स्यपालन, प्रक्रिया उद्योग, कोल्ड स्टोरेज, देशांतर्गत बाजारपेठ आणि निर्यात यांना परस्परांशी जोडणाऱ्या एकात्मिक मत्स्य मूल्यसाखळीच्या विकास मॉडेलबाबत देखील सविस्तर माहिती घेण्यात आली. मत्स्यव्यवसायातील उत्पादनापासून ते प्रक्रिया, बाजारपेठ आणि निर्यातीपर्यंत प्रत्येक टप्प्यावर तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून मत्स्य शेतकरी आणि मच्छीमारांचे उत्पन्न वाढविण्याच्या आंध्र प्रदेशच्या प्रयत्नांचा यावेळी आढावा घेण्यात आला.

आंध्र प्रदेशातील तंत्रज्ञान, डेटा-आधारित व्यवस्थापन आणि संस्थात्मक कार्यपद्धतीतील महाराष्ट्रासाठी उपयुक्त ठरू शकणाऱ्या बाबींचा अभ्यास करून, त्यांचा राज्यातील मत्स्यव्यवसायाच्या विकासासाठी प्रभावी वापर करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील मच्छीमार बांधवांचे उत्पन्न वाढविणे, मत्स्य शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध करून देणे आणि मत्स्यव्यवसाय अधिक सक्षम, शाश्वत व जागतिक स्तरावर स्पर्धात्मक बनविणे हे या अभ्यास दौऱ्याचे प्रमुख उद्दिष्ट आहे.

महाराष्ट्राच्या किनारी भागासह अंतर्देशीय जलस्रोतांचा अधिक शास्त्रीय व उत्पादक पद्धतीने उपयोग करून मत्स्यव्यवसायाच्या माध्यमातून मच्छीमार, मत्स्य शेतकरी आणि किनारी समुदायांसाठी अधिक मूल्यनिर्मिती करण्याच्या दृष्टीने या अभ्यासातील उपयुक्त बाबींची महाराष्ट्रात अंमलबजावणी करण्यासाठी पुढील कार्यवाही करण्यात येईल, असे यावेळी मंत्री नितेश राणे यांनी सांगितले.