
सावंतवाडी : निरवडे - नमसवाडी येथे फेकलेल्या अजीम जुल्फीकार खान याचा मृत्यू बेदम मारहाण व शरीरावरील जखमांमुळे झाल्याचे शवविच्छेदन अहवालात स्पष्ट झाले. याप्रकरणी संशयित मुख्य आरोपी दीपराज संजय गोवेकर व त्याला मृतदेह टाकण्यास मदत करणारा साहिल केशव दिवाडकर दोन्ही रा. ओल्ड गोवा यांना सावंतवाडी पोलिसांनी ताब्यात घेत न्यायालयात हजर केले असता त्यांना १२ ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. सावंतवाडी पोलिसांनी तब्बल २४ तासात या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन छडा लावला आहे.
याबाबत पोलिस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी घटनेची माहिती दिली. ते म्हणाले, मयत अजीम खान हा गेली दोन वर्ष ओल्ड गोवा येथील दीपराज गोवेकर याच्याकडे शोरमा रोल बनविण्यासाठी कामाला होता. तो गोव्यात अन्य दोन सहकाऱ्यांसह राहत होता. दरम्यान, तो दिपराज कडील काम सोडून दुसरीकडे कामाला जाण्याच्या प्रयत्नात होता. मात्र, त्याचा हा निर्णय मालक दिपराज याला पटला नसल्याने त्याने अजीम याला बोलावून घेत तो राहत असलेल्या रूमवर त्याला काठीने बेदम मारहाण केली. या मारहाणीत तो गंभीर जखमी झाला होऊन अस्वस्थ झाला होता. त्यात त्याचा मृत्यू झाला.
मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी मालक दिपराज याने मित्र साहिल दिवाडकर याला सोबत घेत साहिल याच्या नावे असलेल्या अल्टो कारमधून त्याला सावंतवाडी रेल्वे स्थानकानजीक निरवडे नसमवाडी येथे रस्त्याच्या कडेला फेकत पलायन केले.
दरम्यान, पोलिस तपासात मयताच्या बॅगमध्ये आढळलेल्या ओळखपत्र आणि पार्सलवरील पत्यावरून पोलिसांनी गोवा गाठत तपासाची चक्रे फिरवली. यात मालक दीपराज याकडे केलेल्या चौकशीत सुरूवातीला त्याने मयताच्या कौटुंबिक वादाची माहिती देत पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न केला. मात्र, मयताच्या कुटुंब व नातेवाईकांशी केलेल्या चौकशीत मालकानं दिलेली माहीत खोटी असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी पुन्हा एकदा तपासाची चक्रे मयत अजीमच्या सहकाऱ्यांकडे फिरवली.
पोलिसी खाकी दावत त्यांची झाडाझडती घेताच त्यांनी मालक दीपराज याच्याकडून अजीम याला मारहाण करण्यात आली होती असे सांगितले. दरम्यान, पोलिसांनी पुन्हा एकदा दिपराज याला पुन्हा चौकशीत घेतले असता त्याने काम सोडून जाणार असल्याने आपण त्याला मारहाण केली व नंतर मित्र साहिल याच्या अल्टो कारने त्याला सावंतवाडी रेल्वे स्थानकावर सोडल्याचे सांगितले. मात्र, अजीम याचा मृतदेह नमसवाडी रस्त्यावर कसा आला ? हा पोलिसांसमोर उभा राहिला. त्यामुळे त्यांनी दीपराज कडून साहिल दिवाडकर याची झाडाझडती घेतली. यात साहिल याने आम्हीच त्याला नमसवाडी रस्त्यावर फेकल्याचे कबुल केले.
त्यानंतर पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेत सावंतवाडी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करत अटक केली. आज दोघांना न्यायालयात हजर केले असता त्यांना ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणी मारहाण करण्यासाठी वापरलेली काठी, कार हस्तगत करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षकांनी दिली. तर मयताचा मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात दिला जाणार असून नातेवाईक त्यासाठी रवाना झालेत. अवघ्या २४ तासांच्या आत या खुनाचा छडा लावण्यात सावंतवाडी पोलीसांंना यश आले.













