LIVE UPDATES

Maharashtra Cabinet decisions : पोलीस, विद्यार्थी अन् वडार समाजासाठी सरकारकडून कॅबिनेटच्या बैठकीत 7 मोठे निर्णय

Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: October 06, 2026 17:53 PM
views 69  views

मुंबई : राज्य सरकारची मंत्रिमंडळ बैठक आज मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. या बैठकीत 7 महत्वाचे निर्णय घेण्यात आले. तसेच बैठकीत राज्यातील दुष्काळावर चर्चा करण्यात आली. यामध्ये महाराष्ट्रातील शाळा आणि वसतिगृहां संदर्भात महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. मंत्रिमंडळ बैठकीत घेतलेले निर्णय सविस्तर पाहूया.

गृह विभाग

पोलीस दलातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना साहसी कामगिरीसाठी मुख्यमंत्री शौर्य पदक मिळणार आहे. कर्तव्य बजावताना जोखीम पत्करून केलेल्या कामगिरीसाठी रोख 50,000 रुपये पुरस्कार, पदक तसेच प्रशस्तीपत्र देण्यात येणार आहे. निवडीसाठी त्रिस्तरीय विविध समित्यांची रचना करण्यात येणार आहे. वर्षभरातील कामगिरीचीही दखल घेतली जाणार. यावर्षी 1 जानेवारी 2026 पासूनची कामगिरी गृहीत धरली जाणार. दरवर्षी महाराष्ट्र दिन, 1 मेच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री शौर्य पदकांची घोषणा होणार. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शौर्य पदक प्रदान होणार.

पोलीस कोठडीतील मृत्युप्रकरणी नुकसानभरपाई देण्याबाबतच्या धोरणास मंजुरी देण्यात आलेली आहे. पोलीस कोठडीत असताना होणाऱ्या अनैसर्गिक मृत्यूच्या बाबतीत मृताच्या कायदेशीर वारसांना वेळेत आर्थिक सहाय्य देण्यासाठी सर्वसमावेशक असे धोरण.

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग

सामाजिक न्याय विभागांतर्गत स्वयंसेवी संस्थांद्वारे चालविण्यात येणाऱ्या अनुदानित वसतिगृहांतील कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ करण्यास मंजुरी. अधीक्षक, स्वयंपाकी, मदतनीस, चौकीदारांच्या मानधनात भरीव वाढ. राज्यातील सुमारे 2388 अनुदानित वसतिगृहांच्या कर्मचाऱ्यांना दिलासा.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेच्या अनुदानात वाढ करण्यास मंजुरी. शासकीय वसतिगृहात प्रवेशासाठी पात्र, पण अर्ज करूनही प्रवेश न मिळालेल्या अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील अकरावी, बारावी, तसेच बारावीनंतरच्या व्यावसायिक, बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या भोजन, निवास व शैक्षणिक सुविधांसाठी मिळणाऱ्या भत्त्यांमध्ये वाढ. 

महसूल, नोंदणी व मुद्रांक शुल्क विभाग

वडार समाजाला मोठा दिलासा. पारंपरिक दगडफोडी व उत्खननातील गौण खनिज स्वामित्वधनासाठी (रॉयल्टी) वाढीव सवलत. वार्षिक उत्खनन मर्यादा 200 ब्रासवरून 500 ब्रास करण्यात येणार. त्यासाठी महाराष्ट्र जमीन महसूल (गौण खनिजांचे उत्खनन व ती काढणे) नियम, 1968 मध्ये सुधारणा करण्यास मंजुरी. 

उच्च व तंत्रशिक्षण विभाग

शैक्षणिक संस्थांसाठी उच्च व तंत्रशिक्षण क्षेत्रातील नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान, संशोधनासाठी सी.एम. सृष्टी (CM SRISTHI - Scheme for Research, Innovations and Technological Hubs in Higher Education Institutions) योजना राबविण्यास मंजुरी. राज्यातील सर्व सार्वजनिक विद्यापीठे, शासकीय उच्च व तंत्रशिक्षण संस्था, शासकीय तंत्रनिकेतने, रसायन तंत्रज्ञान संस्था - आयसीटी, मुंबई, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग तंत्रज्ञान विद्यापीठ, पुणे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे-रायगड या संस्थांच्या माध्यमातून योजना राबविणार.

आदिवासी विकास विभाग

अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठीच्या पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयम् योजनेतील भत्त्यांमध्ये सुधारणा करण्यास मंजुरी.