
देवगड : शिक्षण विकास मंडळ, देवगड संचलित श्री. स. ह. केळकर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ, मराठी भाषा विभाग आणि राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ‘अभिजात मराठी भाषा सप्ताह’ निमित्त विशेष व्याख्यानाचे आयोजन सोमवार ५ ऑक्टोबर रोजी सकाळी ९.३० वाजता महाविद्यालयाच्या ग्रंथालय सभागृहात करण्यात आले होते.
या कार्यक्रमाची सुरुवात महात्मा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून शिक्षण विकास मंडळ, देवगडचे संस्था प्रतिनिधी सहकार्यवाह विश्वामित्र खडपकर यांनी केली. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार कुनुरे, उपप्राचार्य प्रा. श्रीकांत सिरसाठे, उपप्राचार्य डॉ. लक्ष्मण सुरवसे, प्रमुख व्याख्याते सुशील म्हसदे आणि सागर कांबळे, संपादकीय सहायक, महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ, मुंबई आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. श्रीकांत सिरसाठे यांनी महात्मा फुले यांच्या अखंड, गुलामगिरी,शेतकऱ्याचा आसूड, अशा विविध ग्रंथांचा सारांश सांगत त्यांचे तत्कालीन विचार आजच्या समाजाला दिशादर्शक असल्याचे सांगितले. तद्नंतर शिक्षण विकास मंडळ, देवगडचे संस्था प्रतिनिधी सहकार्यवाह विश्वामित्र खडपकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आहे. 'अभिजात मराठी भाषा सप्ताह' निमित्ताने शुभेच्छा दिल्या.
महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे संपादकीय सहायक सागर कांबळे यांनी मराठी भाषेचा अभिजात दर्जा, तिचा इतिहास, विश्वकोश निर्मितीचे कार्य आणि मराठीचे भविष्य या विषयांवर ते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाला प्रमुख अतिथी सुशील म्हसदे यांनी 'महात्मा फुले यांचे अभिजात साहित्य ' या विषयावर व्याख्यान दिले. या व्याख्यानात त्यांनी विद्यार्थ्यांना महात्मा फुले यांचे साहित्य हे कालातीत असून ते संवाद करायला शिकविते, सकारात्मक विचार तसेच विज्ञानवादी दृष्टिकोन शिकवत असून ते आजच्या समाज जीवनाशी ते निगडीत असल्याचे नमूद करत महत्व अधोरेखित केले. प्राचार्य डॉ. विजयकुमार कुनुरे यांनी अभिजात मराठी भाषेचे महत्त्व विशद करत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. पूजा नारिंगेकर यांनी तर प्रास्ताविक प्रा. संतोष गिडये यांनी केले .कुमारी प्रसिद्धी जोईल हिने आभारप्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता केली. या कार्यक्रमास विद्यार्थी, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि देवगड परिसरातील मराठी भाषा प्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.











