
सिंधुदुर्ग : निसर्गाच्या सानिध्यात रमणारे, तंदुरुस्तीची आवड असलेले आणि माणसांशी कायम मनाने जोडले गेलेले अष्टपैलू अभिनेते तथा समाजसेवक नाना पाटेकर यांच्या अकाली निधनाने संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. वयाच्या पंच्याहत्तरीत त्यांनी जगाचा निरोप घेतला असला, तरी त्यांचे कर्तृत्व आणि समाजकार्य कधीही विसरता येणार नाही.
विशेषतः, २०१७-१८ च्या काळात त्यांनी 'नाम फाऊंडेशन'च्या माध्यमातून कोकणातील नाटळ गावाला दिलेली मोलाची मदत आजही येथील ग्रामस्थांच्या मनावर कायम आहे, अशी भावना नाटळ गावचे माजी ग्रामविकास अध्यक्ष विश्वनाथ मनोहर सावंत यांनी व्यक्त केली आहे.
नदी पुनर्जिवनाचा कठीण लढा आणि नानांचा मदतीचा हात २०१७ च्या अखेरीस नाटळ गावातील सह्याद्रीतून वाहत येणाऱ्या दगड-गोट्यांमुळे नदी उथळी झाली होती, ज्यामुळे पावसाळ्यात पाणी घरांमध्ये आणि शेतात शिरत होते. नदी पूर्ववत करण्यासाठी ३० ते ३५ लाख रुपयांची मोठी गरज होती. गावकऱ्यांनी निधी जमवण्याचे प्रयत्न सुरू केले असताना, कोल्हापूरचे पत्रकार मित्र राजू परुळेकर यांच्या सल्ल्याने विश्वनाथ सावंत यांनी नाना पाटेकर यांना व्हॉट्सॲपवरून मदतीची हाक घातली.
विशेष म्हणजे, मेसेज पाठवल्याच्या अवघ्या दीड तासातच नानांच्या कार्यालयातून प्रतिसाद मिळाला. 'नाम फाऊंडेशन'चे खजीनदार राजीव सावंत आणि गणेश थोरात यांनी थेट नाटळ गावाला भेट देऊन नदीची अवस्था प्रत्यक्ष पाहिली. त्यानंतर लागलीच नाम फाऊंडेशनतर्फे नाटळमध्ये पोकलेन मशीन पाठवण्यात आले. “डिझेलची कमतरता कधीच पडू देऊ नका,” असे सांगत नानांनी या कामाला पूर्ण पाठींबा दिला.
नाटळच्या भूमीवर कायम राहील नानांचे ऋण
नाना पाटेकर आणि नाम फाऊंडेशनच्या या मदतीमुळे फेब्रुवारी-मार्च २०१८ दरम्यान नदीतील गाळ, दगड-गोटे आणि अडथळे दूर करण्याचे सुमारे २० लाख रुपयांचे काम यशस्वीरीत्या पूर्ण झाले. या मदतीमुळे केवळ नाटळची नदीच पुनर्जीवित झाली नाही, तर गावकऱ्यांनाही जलसंवर्धनासाठी नवीन ऊर्जा मिळाली.











